Latest Posts

विदर्भात थकीत वीजबिलाच्या वसुलीची मोहीम वेगात : सुट्टीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्र सुरु

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : विदर्भात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील वीजग्राहकांकडे चालू व थकीत वीजबिलांपोटी १८३.८४ कोटींची थकबाकी असल्याने वसूली मोहिमेला वेग देत थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी चालू व थकीत बिलांचा भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गदचिरोली, गोंदीया, भंडारा, अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी २८ ऑक्टोबर व रविवारी  ऑक्टोबर २९ या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहे.

महावितरणच्या नागपूर प्रादेशिक विभागात सद्यस्थितीत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे चालू व थकीत वीज बिलापोटी १८३.८४ कोटींची थकबाकी आहे. यात अकोला परिमंडलातील ६३.८५ कोटी, अमरावती परिमंडलात ४१.१२ कोटी, चंद्रपूर परिमंडलात ५.५३ कोटी, गोंदिया परिमंडलात ९.६३  कोटी आणि नागपूर परिमंडलात ६३.७१ कोटीच्या थकबाकीचा समावेश आहे. वीजबिलांचा नियमित भरणा होत नसल्याने महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. महावितरणची आर्थिक भिस्त केवळ वीजबिलांच्या वसुलीवर अवलंबून आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी चालू व थकीत बिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन नागपूर प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी केले आहे. वीजग्राहकांना http://www.mahadiscom.in/’www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने विनामर्यादा वीजबिलाचा भरणा करता येतो.

या व्यतिरिक्त महावितरणने 5 हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशील संबंधित ग्राहकांच्या वीजबिलावर उपलब्ध आहे. सध्या सुरू असलेल्या महावितरणच्या धडक मोहिमेमध्ये वीजपुरवठा खंडित केलेल्या थकबाकीदारांच्या वीजजोडण्याची स्वतंत्र पथकाद्वारे तपासणी सुरू आहे.

थकबाकीदार शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास शेजारी व संबंधित थकबाकीदारांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५/१३८ नुसार कारवाई करण्यात येत आहे.

Latest Posts

Don't Miss