Latest Posts

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही पांढरवानी, पिपरहेटी या गावात लालपरीचे दर्शन नाही

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / सिंदेवाही(Sindewahi)  : वाट पाहीन पण एसटीनेच जाईन हे ब्रीदवाक्य अनेकदा आपल्या कानावर पडले असेलच. ग्रामीण भागाची लाईफलाईन म्हणुन लालपरीची ओळख आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब प्रवाश्यांना या बसचा मोठा आधार आहे. आमच्या इथे रस्ता कितीही खराब असु देत, कितीही उशीर होवु देत, ती बस दररोज न चुकता गावात येते. बाहेरगावी जाण्यासाठी एसटीवरच अवलंबून असतात. त्यामुळे एसटीची अवस्था कशीही असली तरी अगदी दळण आणण्यापासुन ते शिक्षण, आरोग्य, बाजारपेठ या सुविधा लोकांपर्यंत एसटीच पोहचवते.

सिंदेवाही तालुक्याच्या ठिकानापासुन १६ ते १७ की.मी अंतरावर पांढरवानी व पिपरहेटी हे दोन गावे आहेत. डोंगर, नाले, उखडलेला डांबरी रस्ता व कच्चा रस्ता, क्वचित दिसणारी विरळ वस्ती, माळरान नाहीतर झाडांमधून क्वचितच दिसणारी माणसं, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अभयारण्याच्या बफर झोन क्षेत्रात वसलेले दोन गावे. या दोन्ही गावात किंवा शेजारी दिवसाढवळ्या वाघ दिसला नाही तर नवलच. रात्रीची गोष्ट तर निराळीच असते. घराच्या व गावाच्या सभोवताली किर्र असे भयावह जंगल. या जंगलातून रोज वाघ गावाचा फेरफटका मारीत असतो. पण परिस्थिती व वातावरण तसे असल्यामुळे या जंगलाची व वाघाच्या सानिध्यात उदरनिर्वाह करण्याची एकप्रकारे सवयच पडली आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही या दोन्ही गावात लालपरी अजुनही पोहोचली नाही. यामुळे येथील नागरिक व विद्यार्थी पुरते हतबल झाले आहेत. प्रत्येक नागरिकाच्या ज्या प्राथमिक गरजा असतात त्यापासुन हे दोन्ही गाव वंचित राहीले आहेत. या प्राथमिक गरजा भागविण्यासाठी येथील लोक टु व्हिलरचा वापर करतात. त्यातही वाघाची भीती कायमच असते. बाजारपेठ, प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुक्यातील शासकीय कामे, तलाठी कार्यालय, चक्कीवर दळण दळणे, स्वस्त धान्य दुकान या सारखे कामे मोठ्या नामुष्कीने होतात.

या गावात लालपरीच्या नसल्याने स्त्रियांच्या प्रसुती दरम्यान अनेक अडचणी येतात. प्राथमिक आरोग्य केंद्र वासेरा हे ६ की.मी दुर आहे. हा ६ की.मी चा रस्ता प्रचंड जंगलाने वेढला आहे. गावात डाॅक्टरची व्यवस्था नाही. या गावात १ ते ४ अशी प्राथमिक शाळा आहे. त्या पण पटसंख्या नसल्यामुळे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. गावातील कित्येक विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडुन दिले आहे. किंवा निवासी आश्रमशाळेत पर्यायी व्यवस्था म्हणुन शिक्षण घेत आहेत. जंगलात गाव असल्यामुळे रोजगाराची व्यवस्था नाही. म्हणुन येथील नवयुवकांनी रोजगारासाठी मोठ्या शहराकडे धाव घेतली आहे. सततची वन्यप्राण्यांची भीती मनामध्ये असते. यामुळे कोणत्याही संकटकालीन मदतीसाठी या दोन्ही गावात बससेवा सुरु होणे अत्यंत गरजेचे आहे.

या दोन्ही गावात बससेवा सुरु झाली तर ही गावे जीवनाच्या मुख्य प्रवाहात सामील होतील. नुकत्याच महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाच्या तरतुदीनुसार एसटी बसमध्ये महिलांना तिकीटामध्ये ५०% सवलत मिळेल. जी सुरक्षितता एसटीच्या प्रवासात आहे ती इतर खाजगी प्रवासात मिळत नाही. अनेक सवलती एसटी मध्ये दिल्या जातात ज्या आर्थिकदृष्ट्या ग्रामीण भागासाठी महत्त्वाच्या ठरतात. अपघातासारख्या घटना घडल्या तर निधीची व्यवस्था, प्रवासामध्ये जेष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, महिला, विद्यार्थी यांना मिळ्णार्या सवलती यामुळे ग्रामीण भाग हा बर्यापैकी एसटीवर अवलंबून आहे. आणि त्याचा या प्रवास व्यवस्थेवर विश्वास आहे.

Latest Posts

Don't Miss