विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : राज्यात ग्रामीण भागातील बेरोजगार युवकासह पशुपालक व शेतकरी बांधवाना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देत,त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमाद्वारे राज्याचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. जिल्ह्यातील पशुपालक, शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे.
पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करणेसाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली चार वर्ष ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरु करण्यात आली आहे. सन २०२१ -२२ पासून जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी सुध्दा सदर संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामध्ये शासनाने एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये, यासाठी तयार केलेली प्रतिक्षायादी सन २०२१ – २२ पासून पुढील ५ वर्षापर्यंत म्हणजे सन २०२५ -२६ पर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असुन, त्याची प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे.
नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळू गाई-म्हशींचे गट वाटप करण, शेळी-मेंढी गट वाटप करणे, १ हजार मांसल कुक्कुट पक्षाच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, १०० कुक्कुट पिलांचे पाटप व २५ +३ तलंग गट वाटप या योजनासाठी ऑनलाईन पध्दातीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन २०२३ -२४ या वर्षात राबविली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबीमध्ये अर्ज करावयाचा आहे. त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
कागदपत्रे अपलोड करण्यासाठी कालावधी ९ नोव्हेंबर (सकाळी १०.०० पासून) ते ८ डिसेंबर, २०२३ (रात्री १२.०० वाजेपर्यंत) असून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अॅट्रॉईड मोबाईल अप्लीकेशनच्या AH-MAHABMS (Google play store) नावासह https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. टोल फ्री क्रमांक १९६२ किंवा १८००-२३३-०४१८असा आहे. अधिक माहितीसाठी पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा.