– पडताळणी समितीकडे १४ सप्टेंबरपर्यंत सादर करता येणार अर्ज
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयंअर्थसहाय्यित शाळा, खाजगी विनाअनुदानित व खाजगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये अल्पसंख्याक शाळा वगळून २५% प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून आरटीईच्या प्रतीक्षाधीन यादीतील तिसऱ्या फेरीतील बालकांची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे.
प्रतिक्षाधीन यादीतील तिसऱ्या फेरीतील बालकांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांनी १४ सप्टेंबरपर्यंत तालुका पडताळणी समितीकडे संपूर्ण कागदपत्रासह प्रत्यक्ष संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ % ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ७ जून ला काढण्यात आलेल्या सोडतीची निवड यादी व प्रतिक्षा यादी २० जुलै रोजी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता RTE PORTAL वरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या बालकाचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती पहावी. वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे व सूचनांचे पालन करावे.
कोणत्याही आमिषाला व प्रलोभनाला बळी पडू नये, प्रवेशासाठी बनावट कागदपत्र तालुका पडताळणी समितीकडे सादर करू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.