Latest Posts

१० वी आणि १२ वीच्या वेळापत्रकाबाबत अद्याप घोषणा नाही : समाजमाध्यमाहून प्रसारित होणारे वेळापत्रके चुकीचे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara): फेब्रुवारी – मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ.१२ वी व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इ. १० वी च्या लेखी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रके महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च मा‍ध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाहीत, असे स्पष्टीकरण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे. या परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत समाजमाध्यमाहून प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती चुकीची असून ग्राह्य धरण्यात येऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

काही संकेतस्थळाहून फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांची वेळापत्रके जाहीर करण्यात आली असल्याबाबतची बातमी समाजमाध्यमांहून प्रसारित झाली आहे. याबाबत मंडळाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यानुसार समाजमाध्यमांहून प्रसिद्ध करण्यात आलेली फेब्रुवारी- मार्च २०२५ च्या इ.१० वी व १२ वी परीक्षांचे वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. या परिक्षांची सविस्तर विषयनिहाय वेळापत्रके स्वतंत्रपणे मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येतील. याची सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व अन्य घटकांनी नोंद घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.

मंडळाचा लोगो अथवा नावाचा वापर करुन परिक्षेबाबत चुकीची माहिती प्रसारित करुन पालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्यामध्ये संभ्रम निर्माण केल्यास त्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Latest Posts

Don't Miss