विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : मुदतीत मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ता कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना पालिकेने जप्तीची नोटीस बजावली आहे. वेळेत कर भरणा न केल्यास पालिका अधिनियमानुसार सुरुवातीला मालमत्तेतील वस्तू जप्त करुन लिलाव केला जाईल आणि जप्त वस्तूंमधूनही कर वसूल झाला नाही तर, मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल, असे पालिकेने नोटिशीद्वारे स्पष्ट केले आहे.
मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. त्यामुळे मालमत्ता कराचे वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न कर निर्धारण व संकलन विभागाकडून केले जात आहेत. शिवाय विविध माध्यमांतून जनजागृतीही करण्यात येत आहे.
मालमत्ता कर भरताना होणारी गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. याबाबतची माहिती पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरीही वारंवार सूचना देऊनही काही मोठ्या थकबाकीधारकांकडून अजूनही मालमत्ता कर न भरल्याने आणि योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे.
दंड रकमेसह थकबाकी रकमेचा यात समावेश आहे. नियमानुसार यानंतर लिलावाची कार्यवाही करण्यात येईल. यामुळे नोटीस मिळालेल्या मालमत्ताधारकांनी कारवाई टाळण्यासाठी तातडीने कराचा भरणा करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
अशी आहे कारवाईची प्रक्रिया –
मालमत्ता कराची देयके मिळाल्यापासून ९० दिवसांच्या आत मालमत्ता कराची थकबाकी पालिकेकडे जमा करणे आवश्यक आहे. या कालावधीत कराचा भरणा न केल्यास पालिकेकडून कारवाई सुरू करण्यात येते.
पालिकेच्या कर निर्धारण व संकलन खात्याचे अधिकारी प्रत्यक्ष संपर्क आणि संवाद साधून मालमत्ता कर भरण्यासाठी पाठपुरावा केला जातो. तरीही मालमत्ता कर न भरल्यास त्यांना डिमांड लेटर पाठवण्यात येते. यानंतरच्या पुढच्या टप्प्यात मालमत्ता धारकाला २१ दिवसांची अंतिम नोटीस दिली जाते. त्यानंतर थकबाकीदारांची मालमत्ता जप्ती, लिलाव आदी कारवाई केली जाते.