Latest Posts

२९ जुलै ते ३ ऑगस्ट कालावधीत विशेष लोक अदालत सप्ताहाचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : लोक अदालतीमध्ये तडजोडीव्दारे निकाली निघालेल्या प्रकरणांमुळे प्रकरणातील पक्षकारांसोबत शासन आणि समाज या दोनही घटकांना मोठा लाभ प्राप्त झाला आहे. तसेच लोक अदालतीमुळे न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झाले असल्यामुळे २९ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत विशेष लोक अदालत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी ज्या पक्षकारांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अशी प्रकरणे आपसी समन्वयातून तडजोडीने सोडविण्याकरीता विधी सेवा प्राधिकरण यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष संजय भारुका व सचिव विवेक देशमुख यांनी केले आहे.

न्यायालयातील तडजोड पात्र प्रलंबित प्रकरणे आपसी सामंजस्यातून तडजोडीव्दारे निकाली काढण्याकरीता लोक अदालत हे प्रभावी माध्यम म्हणुन समोर आलेले आहे. लोक अदालतीचे हे यश लक्षात घेता आणि लोक अदालतीव्दारे पक्षकारांना जलद गतीने मिळणारा दिलासा लक्षात घेता सर्वोच्च न्यायालय यांनी त्यांच्याकडे  प्रलंबित असलेली ताडजोडपात्र प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्याकरीता विशेष लोक अदालत सप्ताहाचे आयोजन २९ जुलै ते ३ ऑगस्ट  कालावधीत केलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाकडील प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासंदर्भात पहिल्यांदाच हा असा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यातील ज्या पक्षकारांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यांच्याकरीता आपली प्रकरणे आपसी समन्वयातून तडजोडीने निकाली काढण्याकरीता ही एक सुवर्णसंधी सर्वोच्च न्यायालयाने उपलब्ध करुन दिलेली आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन तडजोडपात्र प्रकरणे या विशेष लोक अदालतमध्ये आपसी तडजोडीने सोडविण्याकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचेकडे संपर्क साधावा.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या माध्यमातून पक्षकारांना त्याचप्रमाणे प्रकरणातील वकीलांना आभासी व्यासपीठाव्दारे या विशेष लोक अदालतीमध्ये उपस्थित होता येणार आहे. व तडजोडीने आपली प्रकरणे निकाली काढता येईल. त्यामुळे पक्षकारांनी या संधीचा पुरेपुर लाभ घ्यावा व आपली प्रकरणे सामंस्याने सोडवावी.

विशेष लोक अदालतचे फायदे- जलद तडजोड आणि विवादांचे निराकरण, अंतिम आणि कार्यान्वित निर्णय, विवादांचे किफायतशीर निराकरण, प्रकरणात लागलेली कोर्ट फी चा परतावा.

विशेष लोक अदालतबाबतची माहती सर्वोच्च न्यायालयाच्या https://www.sci.govin या संकेतस्थळावर उपलब्ध असुन अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या ८५९१९०३९३२ या मोबाईल क्रमांकावर किंवा ०७१५२-२४५५९४ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss