विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : देशात एकाबाजूला लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तर दुसरीकडे वातावरणात देखील उष्णता चांगली वाढली आहे. हवामान खात्याने (IMD) पुढील पाच दिवस दिल्ली, पंजाब आणि हरियाणामध्ये तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.
देशाच्या अनेक भागांना उष्णतेचा फटका सहन करावा लागला आहे. सोमवारी, दिल्लीचे तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, तर याआधी देखील शहरात हंगामातील सर्वाधिक ४४.४ अंश नोंदवले गेले होते. आज जारी करण्यात आलेल्या IMD बुलेटिननुसार, राजस्थानच्या काही भागांमध्ये मंगळवार ते शुक्रवार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात सोमवार आणि मंगळवारी तीव्र उष्णतेची लाट राहील. दरम्यान, या आठवड्यात गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार आणि उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या पहाडी राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या आठवड्यात, मंगळवार, शुक्रवार आणि शनिवारी दिल्लीत पारा ४५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील रहिवाशांनी सोमवारी प्रचंड उकाडा अनुभवला आहे. आज सकाळी किमान तापमान २९.२ अंश सेल्सिअसवर स्थिरावले असून हे हंगामातील सरासरीपेक्षा तीन अंशांनी जास्त होते, असे मत IMD ने नोंदवले आहे. दरम्यान, रविवारी, संपूर्ण देशातील किमान आठ ठिकाणी पारा ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. दिल्लीच्या नजफगढ भागात ४७.८ अंश नोंदवले गेले. गेल्या तीन दिवसांत ते दुसऱ्यांदा देशातील सर्वात उष्ण ठिकाण ठरले आहे.
राजस्थानमध्ये, श्रीगंगानगर आणि अंता येथे सर्वाधिक ४६.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर हरियाणातील नूह हे सर्वाधिक ४७.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. दरम्यान, पंजाब आणि हरियाणाची राजधानी चंदीगडमध्ये ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
पंजाबमधील फरीदकोट हे ४४ अंश सेल्सिअस तापमानासह सर्वात उष्ण ठिकाण ठरले. तर अमृतसर ४३.९ अंशांसह दुसऱ्या स्थानावर होते. मध्य प्रदेशातील दतिया येथे ४७.५ अंश, तर उत्तर प्रदेशातील आग्रा येथे ४७.७ अंश आणि झाशी येथे ४७.२ अंशांची नोंद झाली.
IMD ने वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त केली आहे आणि उष्णतेच्या लाटेची शक्यता असलेल्या भागातील लोकांना आवश्यक असल्यास दुपारच्यावेळी बाहेर पडण्याचे तसेच हलक्या रंगाचे सुती कपडे घालण्याचे, डोके झाकण्यासाठी टोपी आणि छत्र्या वापरण्याचे आवाहन केले आहे.
सर्व वयोगटातील लोकांमध्ये उष्णतेचे आजार आणि उष्माघात होण्याची दाट शक्यता असते आणि लहान मुले, वृद्ध आणि जुनाट आजार असलेल्या लोकांसाठी आरोग्याची चिंता असते, असे हवामान खात्याने म्हटले आहे. दरम्यान, या आठवड्यात कर्नाटक, तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
त्यात म्हटले आहे की, लक्षद्वीपच्या काही भागात सोमवार आणि मंगळवारी मुसळधार पाऊस पडेल, तर अंदमान आणि निकोबार बेटांवर पुढील सात दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.