Latest Posts

डोंबिवलीतील ४५ कंपन्या बंद : राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आदेश 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / ठाणे (Thane) : अमुदान कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात १७ बळी गेल्याच्या घटनेला अवघे २३ दिवस उलटतात तोच इंडो अमाईन आणि मालदे कंपनीत झालेल्या भीषण अग्नितांडवाने डोंबिवली पुन्हा हादरली. कुंभकर्णी झोपेत असलेल्या मिंधे सरकारला त्यानंतर खडबडून जाग आली असून राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने आज डोंबिवली एमआयडीसीतील ४५ कंपन्या बंद करण्याचे आदेश दिले आहेत. प्रदूषण मंडळाने या सर्व कंपन्यांना क्लोजर नोटिसा बजावल्या आहेत.

डोंबिवली एमआयडीसीमध्ये गेल्या दहा वर्षांपासून अनेक दुर्घटना घडत असून आतापर्यंत काहींना आपला जीवदेखील गमवावा लागला. २३ मे रोजी अमुदान कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन महिना उलटत नाही तोच बुधवारी सकाळी पुन्हा इंडो अमाईन या कंपनीला आग लागली. ही आग एवढी भीषण होती की, त्याची झळ शेजारच्या मालदे कंपनीला बसली आणि ही कंपनीदेखील भस्मसात झाली. दैव बलवत्तर म्हणून सुमारे वीस कामगारांचे प्राण वाचले. मात्र या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्फोट व आगीचे प्रकार सतत घडत असल्याने त्याची गंभीर दखल प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेऊन एमआयडीसीमधील ४५ कंपन्यांना नोटिसा पाठवल्या आहेत.

धोकादायक कंपनीच्या यादीत इंडो अमाईन आणि मालदे या पंपन्यांचादेखील समावेश होता. प्रदूषणकारी व धोकादायक कंपन्यांना रेसिडेन्शिअल विभागातून स्थलांतर करण्याबाबत विचार सुरू आहे. त्या अनुषंगाने विशेष समितीच्या तीन बैठका झाल्या आहेत. २० जूनपर्यंत सर्वेक्षण समिताचा अहवाल येणार असून त्यानंतच कृती आराखडा तयार करणार असल्याचे महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

या घटनेनंतर सरकारने गणेश पॉलिकेम, घरडा केमिकल, ऑक्टल प्रोडक्शन, मेट्रो पॉलिटेन, क्वालिटी इंडस्ट्रिज यांसह प्रदूषणकारी कंपन्या तळोजा एमआयडीसीत स्थलांतरित करण्याचा घेतलेला निर्णय कागदावरच आहे.

३६ कंपन्यांनी जल व वायू कायद्याचे उल्लंघन केल्याने त्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. तर उर्वरित ९ कंपन्यांनीदेखील कायदा धाब्यावर बसवल्याने मालकांना स्वत:हून उत्पादन बंद करण्यास सांगितले आहे.

डोंबिवली एमआयडीसीत ४३२ कारखाने आहेत. यापैकी २५० ते २७५ कंपन्या धोकादायक आणि अतिधोकादायक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Latest Posts

Don't Miss