Latest Posts

भारत बंदच्या समर्थनार्थ गांधी चौकात करणार धरणे आंदोलन

– मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : संयुक्त किसान मोर्चा व कामगार कृती समिती यांनी केंद सरकारच्या जनहित विरोधी धोरणांविरोधात देशव्यापी ग्रामीण भारत बंदची हाक दिली आहे. त्यानुसार भारत बंदच्या समर्थनार्थ गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात दुपारी १२.०० वाजता विविध राजकीय पक्ष, शेतकरी व कर्मचारी आणि कामगार संगटनांच्या वतीने केंद्र सरकारच्या जनहित विरोधी धोरणा विरोधात धरणे आंदोलन करण्यात येणार असून यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रागतिक पक्ष महाराष्ट्र आघाडीने केले आहे.

शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांना खर्चाच्या दिडपट हमीभाव देण्यात यावा. व हमीभाव कायदा करण्यात यावा. स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, शेती पंपासाठी मुबलक वीज पुरवठा करण्यात यावा, महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले बोनस तातडीने वाटप करण्यात यावे, कर्मचाऱ्यांना जूनी पेंशन लागू करण्यात यावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेतले जावे, असंघटित कामगारांना किमान २६ हजार रुपये मानधन देण्यात यावे, ६० वर्षांवरील असंघटित कामगार, शेतकरी, शेतमजूरांना पेंशन योजना लागू करावी. तलाव, धरणावर सौर ऊर्जा प्रकल्पांना मंजुरी देवून मच्छीमार समाजाचे व्यवसाय संपविणे तातडीने थांबविण्यात यावे. प्री – पेड विद्युत मीटर रद्द करण्यात यावे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात पेसा व वनहक्क कायद्यांची अंमलबजावणी करण्यात यावा. लोह खाणी खोदण्यासाठी स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांवरील अन्याय करणे बंद करण्यात यावे. कोनसरी लोह प्रकल्पांसाठी बळजबरीने जमीन संपादन करणे थांबविण्यात येवून भूसंपादन कायदा २०१३ ची अंमलबजावणी करण्यात यावी. मेडीगट्टा धरणग्रस्तांना न्याय देण्यात यावा. वडसा – गडचिरोली रेल्वे लाईनच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीतून माती – मुरुमाचे उत्खनन करून शेती उध्वस्त करणे बंद करण्यात यावे, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी व मृत शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी, हत्ती, डुक्कर, निलगाय यासारखे वन्यप्राण्यांनी पीकांचे नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा स्थानिक मागण्याही या भारत बंदच्या समर्थनार्थ होणाऱ्या धरणे आंदोलनात केल्या जाणार आहेत.

भाजप सरकारच्या विरोधातील प्रागतिक पक्ष महाराष्ट्र आघाडी, व काॅंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उबाठा) यांच्या सह कर्मचारी महासंघ, आयटक, सीटू यांच्यासह विविध शेतकरी, कामगार संघटना आणि शेतकरी, कामगार, मच्छीमारांनी या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते काॅ. डॉ. महेश कोपूलवार, काॅ. देवराव चवळे, ॲड. जगदीश मेश्राम, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, हंसराज उंदिरवाडे शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जयश्री जराते, शामसुंदर उराडे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड, जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, प्रतिक डांगे, सतिश दुर्गमवार, माकपचे काॅ. अमोल मारकवार, समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष इलियास पठाण, गोंडवाना गणतंत्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत मडावी, आदिवासी विकास युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष विनोद मडावी यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss