Latest Posts

डिग्री नसलेला सर्जन करत होता ऑपरेशन : घेतले अनेकांचे जीव, चार जणांना अटक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : दिल्लीच्या पॉश भागात असलेल्या ग्रेटर कैलासमध्ये एक नामांकित मेडिकल सेंटरमधील डॉक्टर सर्जरीची डिग्री नसतानाही रुग्णांच्या जीवाशी खेळत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी पित्त मूत्राशय किंवा इतर कोणत्याही आजाराच्या उपचारासाठी लोक येत असत, परंतु ऑपरेशनमुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला.

अखेर अनेक मृत्यूंनंतर ही फसवणूक उघडकीस आली. या मेडिकल सेंटरचे प्रमुख, त्यांची पत्नी, आणखी एक एमबीबीएस डॉक्टर यांच्यासह चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. नीरज अग्रवाल, त्यांची पत्नी पूजा अग्रवाल, डॉ. जसप्रीत आणि महेंद्र अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यापैकी डॉ. नीरज हे एमबीबीएस आहेत आणि डॉ. जसप्रीत एमबीबीएस आणि एमएस आहेत. डॉक्टर नीरज यांची पत्नी पूजा सहाय्यक म्हणून काम करत होती आणि महेंद्र हा आधी लॅब टेक्निशियन म्हणून काम करत होता. मेडिकल सेंटर आणि आरोपींच्या घरातून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित औषधे, कालबाह्य झालेले सर्जिकल ब्लेड, वेगवेगळ्या रुग्णांचे प्रिस्क्रिप्शन, विविध बँकांचे 47 चेकबुक, 14 एटीएम कार्ड, पासबुक आणि 6 क्रेडिट कार्ड मशीन जप्त केल्या आहेत.

डॉ. जसप्रीत हे एमएस आहेत, परंतु या मेडिकल सेंटरमध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांच्या ऑपरेशनमध्ये त्यांचा सहभाग नव्हता, परंतु त्यांच्याकडे सही केलेले कागदपत्र होते. म्हणजे ऑपरेशन इतर लोकांनी केले होते, कागदांवर सही डॉ. जसप्रीत यांची होती. पुढील तपासासाठी आरोपींना गुरुवारी पोलिस कोठडी सुनावण्यात येणार आहे. दरम्यान, या मेडिकल सेंटरचे मुख्य डॉक्टर नीरज हे सर्जन म्हणून आतापर्यंत त्यांनी अनेक सर्जरी केल्या आहेत. या मेडिकल सेंटरविरोधात ग्रेटर कैलास पोलीस ठाण्यात तक्रारी आल्या होत्या. आठवडाभरापूर्वी रुग्णाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी मेडिकल सेंटर एकच गोंधळ घातला होता. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. यादरम्यान लोकांनी सांगितले की, एका रुग्णाला येथे दाखल केले. त्यावेळी रुग्णावर सर्जरी करण्यात आली, त्यात त्याचा मृत्यू झाला. यानंतर मृताच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. या मेडिकल सेंटरविरोधात यापूर्वीही अनेक तक्रारी आल्याचे तपासात समोर आले आहे. प्रत्येक तक्रारीत मृत्यू झालेल्या रुग्णाची सर्जरी करण्यात आली होती आणि पोलिसांना हे प्रकरण संशयास्पद वाटले. तपासानंतर पोलिसांनी मेडिकल सेंटरचे संचालक डॉ. नीरज अग्रवाल, पूजा अग्रवाल, डॉ. जसप्रीत आणि महेंद्र यांना अटक केली.

बनावट डिग्री घेऊन लॅब टेक्निशियन बनला डॉक्टर!
पोलीस तपासात समोर आलेला महत्त्वाचा खुलासा म्हणजे अटक करण्यात आलेल्या चार आरोपींपैकी महेंद्र हा दिल्लीतील एका मोठ्या रुग्णालयात काम करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरकडे लॅब टेक्निशियन म्हणून काम करत होता. डॉक्टरांना सर्जरी करताना पाहून तो सर्जरी करण्याचे काम शिकला. त्यानंतर त्याने बनावट एमबीबीएसची डिग्री तयार केली आणि मेडिकल सेंटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. मेडिकल सेंटर व्यवस्थापन महेंद्रला कॉल करून रुग्णांची सर्जरी करण्यासाठी बोलावत असे. दरम्यान, महेंद्रने बनावट पदवी कोठून मिळवली आणि या पदवीच्या मदतीने तो लोकांवर कुठे उपचार करत होता, याचाही तपास पोलीस करत आहेत.

Latest Posts

Don't Miss