विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी मुंबई (Navi Mumbai) : उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना त्याच रुग्णालयातील मेडिकल दुकानातून औषधे घेण्याची सक्ती करू नयेत तसेच मेडिकल दुकानाबाहेर याबाबतचे फलक बसविण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनने यापूर्वीच दिले आहेत.
मात्र नवी मुंबई शहरातील अनेक खाजगी रुग्णालयातील मेडिकल दुकानात या नियमांचे पालन केले जात नसून रुग्णालयातील मेडिकल दुकानातून औषधे घेण्याची सक्ती केली जाते. अन्न व औषध प्रशासनाचे बातमीची दखल घेत झोन ७ चे उपआयुक्त रोहित राठोड यांनी कारवाईचे संकेत दिले आहेत.
रुग्णालयात एखादा रुग्ण दाखल असल्यास त्याच्या उपचारासाठी लागणारी औषधे बाहेरून खरेदी करण्यास रुग्णालय प्रशासनाकडून नकार दिला जातो. तसेच रुग्णालयातीलच मेडिकल दुकानातूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती केली जाते. औषधे कोठून खरेदी करावी याबाबतचे स्वातंत्र्य नागरिकांना असावे. यासाठी रुग्णालयातील मेडिकल दुकानातून औषधे खरेदी करण्याची सक्ती न करण्याचे तसेच मेडिकल दुकानाबाहेर याबाबतचे फलक बसविण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने सर्व रुग्णालयातील मेडिकल दुकानांना दिले होते.
परंतु शहरातील काही रुग्णालयातील मेडिकल दुकानाबाहेर अशा प्रकारचे फलक बसविण्यात आले नसून काही ठिकाणी बसविण्यात आलेले फलक देखील नामधारी आहेत. अशा रुग्णालयांमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांना औषधे खरेदीसाठी सक्ती केली जाते. याबाबतचे वृत्त सोमवारी ‘लोकमत’ ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाचे उपआयुक्त राठोड यांनी याबाबत शहरातील सर्व रुग्णालयांना सूचना केल्या असून नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. यामुळे नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.