विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : इस्रोने सूर्याच्या मिशनसाठी पाठवलेल्या आदित्य एल १ या उपग्रहाने सूर्याच्या हॅलो या कक्षेत प्रवेश केला आहे. या प्रवेशासोबत हिंदुस्थानच्या सूर्यमोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. २ सप्टेंबर २०२३ रोजी सूर्य मोहिमेला सुरुवात झाली होती.
४०० कोटी रुपये खर्चून केलेल्या या मोहिमेमुळे इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे. कारण, आदित्य एल १ सूर्याच्या कक्षेत फिरून संभाव्य सौरवादळांची सूचना आधीच पाठवणार आहे.
आदित्य हा सध्या एल १ पॉईंटपर्यंत पोहोचला आहे. एल या अक्षराचा अर्थ होतो लॅरेंज पॉईंट. प्रसिद्ध गणितज्ञ जोसेफी लुई लॅरेंज यांच्या नावाने हा पॉईंट ओळखला जातो. त्यांनीच या पॉईंटचा शोध लावला होता. याचा वैज्ञानिक अर्थ गुरुत्वाकर्षणशून्य जागा असा होतो. कोणताही उपग्रह जेव्हा अवकाशात झेपावतो, तेव्हा त्याला वाटेतील ग्रहांच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत खेचले जाण्याची भीती असते. मात्र, अवकाशात अशा काही जागा असतात, जिथे आसपासच्या ग्रहांचे गुरुत्वाकर्षण उपग्रहावर कोणताही परिणाम करत नाही. अशा जागेला लॅरेंज पॉईंट असे म्हटले जाते.
सूर्याच्या हॅलो या कक्षेत आदित्यपूर्वी नासाचे चार उपग्रह प्रक्षेपित आहेत. WIND, Advanced Composition Explorer (ACE), Deep Space Climate Observatory (DSCOVER) आणि नासा-ESA अशी या चारही उपग्रहांची नावे आहेत. सूर्याच्या बाह्यकक्षेचा अभ्यास करणे, सौरवादळांची माहिती जमा करणे आणि त्याखेरीज सूर्याशी संबंधित अन्य संशोधन यांमध्ये आदित्य महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
सध्या आदित्यने सूर्याचे अनेक फोटो पाठवले आहेत. त्यात सूर्य ११ वेगवेगळ्या रंगांत दिसत आहे. त्यासाठी आदित्यने सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपची मदत घेतली आहे. त्यातून सूर्याच्या फोटोस्फेअर आणि क्रोमोस्फेअर पृष्ठभागाचे फोटो काढण्यात आले आहेत. फोटोस्फेअर म्हणजे सूर्याचा पृष्ठभाग आणि क्रोमोस्फेअर म्हणजे सूर्याचा पृष्ठभाग आणि बाह्य वायूमंडळादरम्यान असलेले पातळ आवरण होय. तेही सूर्यापासून सुमारे २ हजार किमी वर असते.