Latest Posts

आर्थिक उन्नतीसाठी शेतकऱ्यांनी लागत खर्च कमी करून त्यावर प्रक्रिया व विक्री करावे : कुलगुरू डॉ. शरद गडाख

– सिंदेवाही कृषि संशोधन केंद्रात धान महोत्सव अंतर्गत कृषि मेळावा, कृषि प्रदर्शनी व चर्चासत्र संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही (Sindevahi) : सिंदेवाही येथे नुकताच विभागीय कृषि संशोधन केंद्र कृषि विज्ञान केंद्र व कृषि विभाग सिंदेवाही (चंद्रपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धान महोत्सव अंतर्गत कृषि मेळावा, कृषि प्रदर्शनी व चर्चासत्र कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ. शरद गडाख कुलगुरू डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला लाभले. कुलगुरू महोदयांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञाना अवलंब करून लागवडीवरील खर्च कमी करणे, उत्पादित मालाची थेट विक्री न करता त्यावर प्रक्रिया करून स्वतः शेतकरी बांधवांनी विक्री करावी. तसेच कृषि संबंधी आदर्श गांव विकसीत करण्यासाठी कृषि विद्यापीठ, कृषि व कृषि संलग्न विभागानी एकत्र येवून मॉडेल व्हीलेज ची संकल्पना यशस्वी करण्यासाठी संबंधित विभागाचे कार्ये सुरू आहे. त्यानुसार येत्या तीन वर्षामध्ये एक आदर्श गाव आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात विकसित करण्यांत येईल अशी आशा व्यक्त केली. त्यासोबतच येणाऱ्या रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमामध्ये विशेष अतिथी म्हणून डॉ. विलास खर्चे संशोधन संचालक डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला, विभागीय कृषि सहसंचालक यांच्या प्रतिनिधी प्रिती हिरळकर, प्रकल्प संचालक (आत्मा) चंद्रपूर तसेच डॉ. कोल्हे सहयोगी संचालक विभागीय कृषि संशोधन केंद्र सिंदेवाही, डॉ. पी.आर. कडू सहयोगी अधिष्ठाता कृषि महाविद्यालय नागपूर, डॉ. व्ही.एस. टेकाळे सहयोगी अधिष्ठाता कृषि महाविद्यालय मूल, डॉ. माया राऊत सहयोगी अधिष्ठाता कृषि महाविद्यालय सोनापूर गडचिरोली, डॉ. एस.व्ही. साईप्रसाद, पीएस व पीआय पैदासकार आयआयआरआर हैद्राबाद, डॉ. विनोद नागदेवते वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषि विज्ञान केंद्र सिंदेवाही, हेमंत शेंदरे अध्यक्ष शेतकरी व शास्त्रज्ञ मंच कृषि संशोधन केंद्र सिंदेवाही व मच्छिंद्र रामटेके अध्यक्ष शेतकरी व शास्त्रज्ञ मंच कृषि विज्ञान केंद्र सिंदेवाही हे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

प्रास्तविकामध्ये डॉ. कोल्हे यांनी विद्यापीठाने संशोधीत केलेल्या धान पिकाच्या विविध वाणाबद्दल, धान पिकावरील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, बिज प्रक्रियाचे महत्व तसेच यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी विविध कृषि यंत्रे / अवजारे उपलब्धते विषयी सखोल मार्गदर्शन केले. डॉ. एस.व्ही. साईप्रसाद यांनी विभागीय कृषि संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर भेट देवून धान संशोधन प्रात्यक्षिकाची पाहणी प्रशंसा केली. प्रिति हिरळकर यांनी कृषि विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी राबविण्यांत येणाऱ्या कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती दिली.

डॉ. विलास खर्चे यांनी मार्गदर्शनामध्ये शेतकऱ्यांनी शेतीला यांत्रिकीकरणाची जोड देवून, रासायनिक खतांचा अति वापर न करता, पर्यायी खतांचा वापर करावा, रब्बी हंगामात तेलबिया पिकामध्ये करडई, जवस, मोहरी, सूर्यफूल, कडधान्य पिकामध्ये हरभरा, उन्हाळी मूग या पिकांच्या विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणांचा अवलंब करावा तसेच या पिकांचे लागवडी खालील क्षेत्र वाढवून दुबार पीक पध्दतीचा अवलंब करून कृषि उन्नतीमध्ये भरभराट करावी असे सूचवून रबी हंगामाच्या शेतकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या.

प्रक्षेत्र भेटी दरम्यान शेतकऱ्यांना धान कापणी व मळणी यंत्राचे प्रात्यक्षिक, कापणी यंत्र, धानाचे धसकटे बारीक करण्याकरीता व रबी पिकाची पेरणी सुलभ होण्यासाठी स्लॅशर यंत्र, बीबीएफ यंत्राने रबी पिकाची पेरणी यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यांत आले. तसेच प्रक्षेत्रावर लागवड केलेल्या डॉ. पंदेकृवि, अकोला अंतर्गत विकसीत केलेल्या धान वाणांचे प्रात्यक्षिकासंबंधी माहिती डॉ. गौतम शामकुवर यांनी दिली. सोबतच कृषि प्रदर्शनीचे आयोजन करण्यांत आले व मोठया प्रमाणात शेतकऱ्यांनी प्रदर्शनीची पाहणी केली. तांत्रिक मार्गदर्शनामध्ये प्रा. आर.एफ. राऊत प्रभारी अधिकारी कृसंकें नवेगावबांध, संदिप क-हाळे वरिष्ठ शात्रज्ञ तथा प्रमुख व पुष्पक बोथीकर विषय विशेषज्ञ कृविकें गडचिरोली यांनी रब्बी पिकाची यांत्रीकीकृत शेती आणि रब्बी पिकावरील रोग व कीड व्यवस्थापन विषयावर माहिती दिली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. सोनाली लोखंडे यांनी तर स्नेहा वेलादी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागीय कृषि संशोधन केंद्र व कृषि विज्ञान केंद्र व कृषि विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Latest Posts

Don't Miss