विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : अमेरिकेमध्ये हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचे मृत्युसत्र थांबण्याचे नाव नाही. गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेमध्ये हिंदुस्थानी विद्यार्थ्यांवरील हल्ले, हत्या आणि संशयित मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
यात आणखी एका घटनेची भर पडली असून ओहायो राज्यामध्ये हिंदुस्थानी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्याच्या मृत्युमागील कारण स्पष्ट झालेले नाही.
न्यूयॉर्कस्थित हिंदुस्थानी दुतावासाने अमेरिकेमध्ये आणखी एका हिंदुस्थानी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. उमा सत्यसाई गड्डे असे विद्यार्थ्याचे नाव आहे. Uma Satya Sai Gadde हा ओहायो राज्यातील क्लिवलँडमध्ये शिक्षण घेत होता.
ओहायो राज्यातील क्लिवलँडमध्ये शिक्षण घेणाऱ्या उमा सत्यसाई गड्डे याच्या दुर्दैवी मृत्युमुळे खूप दु:ख झाले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आम्ही विद्यार्थ्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहोत. त्यांना शक्य ती मदत केली जात असून त्याचा मृतदेह लवकरात लवकर हिंदुस्थानमध्ये पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे हिंदुस्थानी दुतावासाने एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
अमेरिकेमध्ये हिंदुस्थानी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू होण्याची पहिलीच घटना नाही. जानेवारी २०२४ पासून ते आतापर्यंत अशी १० प्रकरणे समोर आली आहेत. गेल्या महिन्यात बोस्टन विद्यापीठामद्ये इंजिनियरिंगचे शिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय अभिजित पारुचुरू याची हत्या झाली होती. तो आंध्र प्रदेशमधील गुंटूर जिल्ह्यातील रहिवासी होता. त्याआधी पड्यू विद्यापीठात शिकणाऱ्या नील आचार्य, श्रेयस रेड्डी, विवेक सैनी यांचाही संशयास्पद मृत्यू झाला होता.
दरम्यान, यूएसएमध्ये जवळपास ३ लाख हिंदुस्थानी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र गेल्या काही महिन्यात विद्यार्थ्यांवरील हल्ले, हत्येच्या घटना आणि संशयास्पद मृत्यूचे प्रमाण वाढल्याने विद्यार्थ्यांसह त्यांच्या कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण आहे.