Latest Posts

नागपूरच्या धर्तीवर औंधमध्ये साकारणार एम्स : राज्याने केली अंतरिम अर्थसंकल्पात घोषणा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / पुणे (Pune) : नागपूरच्या येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) च्या धर्तीवर आता पुण्यातही एम्स हाॅस्पिटलची उभारणी केली जाणार असल्याची घाेषणा राज्य सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात केली आहे.
हे रुग्णालय औंध जिल्हा रुग्णालयाच्या जागेत प्रस्तावित आहे. त्यामुळे पुणेकरांना आता स्वस्त दरात टर्शरी केअरची सेवा मिळण्यास मदत हाेणार आहे.

जिल्हा रुग्णालय, औंध येथील ८५ एकर जागा वर्षानुवर्षे विनावापर पडून आहे. या ठिकाणी हे हाॅस्पिटल हाेणार असल्याचे अर्थसंकल्पात जाहीर केले आहे. एम्स हाॅस्पिटल किती जागेत असेल, ते कधी अस्तित्त्वात येईल, याबाबतचा तपशील अद्याप उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे त्याचा आराखडा कसा असेल, याबाबत संदिग्धता आहे.

एम्स नागपूरमध्ये सर्व विभागांसह सुमारे ८३० बेड आहेत. त्याच धर्तीवर पुण्यातही राज्य शासनाकडून हे हाॅस्पिटल हाेणार आहे. दरम्यान, पुण्यात ससून जनरल हॉस्पिटल हे एकमेव शासकीय टर्शरी केअर हाॅस्पिटल आहे. परंतु येथे रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे या रुग्णालयावर क्षमतेपेक्षा जास्त भार आहे. पुण्यात एम्स हाॅस्पिटल झाले तर ससूनवरील भार कमी हाेण्यास मदत हाेईल.

औंध जिल्हा रुग्णालयाच्या आवारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आलेले ३० खाटांचे आयुष रुग्णालय आहे, तर नवीन १०० खाटांच्या क्रिटिकलचे भूमिपूजनही केले. औंध जिल्हा रुग्णालयात सुमारे १ हजार रुग्ण बाह्यरुग्ण विभागात येतात.

याबाबत अधिक माहिती देताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले, म्हणाले की, यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुविधेला ही मोठी चालना मिळेल. आयुष हाॅस्पिटल आणि क्रिटिकल केअर या दवाखान्यांना देखभाल रुग्णालयासाठी निधी केंद्र सरकार देईल आणि पहिली पाच वर्षे मनुष्यबळदेखील केंद्र सरकार देईल. परंतु, त्यानंतर राज्य ते चालवेल. मात्र, एम्स हे आरोग्य विभागाच्या अंतर्गत येत नसून, केंद्र सरकारच्या आणि वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मंत्रालयाच्या अखत्यारीत येते आणि त्यामुळे आमच्याकडे त्याबद्दल फारशी माहिती नाही, असे ते म्हणाले.

पुण्यात सध्या बीजे तथा ससून जनरल हॉस्पिटल, बारामती मेडिकल कॉलेज, अटल बिहारी मेडिकल कॉलेज आणि यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल ही सरकारी रुग्णालये असून, त्यानंतर एम्स हे पुणे जिल्ह्यातील पाचवे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय असेल.

Latest Posts

Don't Miss