Latest Posts

मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग : वस्तुसंग्रहालयात मिळणार कामाची संधी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागातील विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया त कार्यांतर्गत प्रशिक्षण (ऑन जॉब ट्रेनिंग) घेता येणार आहे. मुंबई विद्यापीठ आणि संग्रहालयात या संदर्भात नुकतीच बैठक पार पडली.

या बैठकीला विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्रकुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, संग्रहालयाचे महासंचालक डॉ. सब्यसाची मुखर्जी, क्युरेटर (एज्युकेशन आणि प्रोग्राम) वैदेही सवनाल, मानव्यविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अनिल सिंह, सहयोगी अधिष्ठाता प्राचार्य डॉ. सुचित्रा नाईक, विभागप्रमुख प्रा. संदेश वाघ आणि प्रा. मंजिरी कामत उपस्थित होते.

इतिहास विभागातील दुसऱ्या सत्राचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कार्यांतर्गत प्रशिक्षणादरम्यान क्युरेटर, गाइड, संग्रहालय प्रदर्शनाचे आयोजन, जतन व संवर्धनाचे तांत्रिक ज्ञान, संग्रहालय व संग्रह व्यवस्थापन आणि वारसा संवर्धन या अनुषंगिक बाबींचे प्रशिक्षण उपलब्ध होऊ शकेल, असे इतिहास विभागप्रमुख प्रा. संदेश वाघ यांनी सांगितले.

संग्रहालयाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या डोसेंट प्रोग्रामअंतर्गत इतिहास विभागातील निवडक विद्यार्थी येथे कार्यरत आहेत. भविष्यात या कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याचे इतिहास विभागातील प्राध्यापिका आणि संग्रहालयाच्या विश्वस्त प्रा. मंजिरी कामत यांनी सांगितले.
येत्या काळात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीसोबतही कार्यांतर्गत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.

कार्यांतर्गत प्रशिक्षणासाठी विद्यापीठातील विविध विभागांनी पुढाकार घेतला असून त्यानुसार अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. उदयोन्मुख क्षेत्रातील गरजा व संधी यानुसार विद्यार्थ्यांना शिकतानाच प्रात्याक्षिक ज्ञान, अनुभव आणि प्रशिक्षण उपलब्ध व्हावे याअनुषंगाने इतिहास विभागातील दुसऱ्या सत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात कार्यांतर्गत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Latest Posts

Don't Miss