विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : इस्रायल आणि हमास (Israel Hamas War) यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान, गाझा पट्टी (Gaza Attack) निरपराधांसाठी स्मशानभूमी (Graveyard) बनली आहे. येथे दर दहा मिनिटांनी एका चिमुकल्याचा (Child Death) मृत्यू होत आहे, तर दोन मुले जखमी होत आहेत.
इस्रायल आणि हमास (Israel Hamas Conflict) यांच्यातील युद्धाला एक महिना उलटून गेला आहे. इस्रायलने पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास (Hamas) चा नायनाट करण्याचे पक्के केले आहे. त्यामुळे गाझा पट्टी (Gaza Strip) त इस्रायल लष्कराने (Israeli Army) हल्ले तीव्र केले आहेत.
युद्धात निष्पाप चिमुकल्यांचा बळी –
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान गाझा पट्टीमधील परिस्थिती गंभीर आहे. गाझा पट्टी निष्पाप बालकांची स्मशानभूमी बनली आहे. गाझामध्ये दर दहा मिनिटांनी एका बालकाला मृत्यू होत आहे, तर दोन मुलेही जखमी होत आहेत. पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या युद्धात १० हजारहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे की, इस्रायली हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ७० टक्के मुले, महिला आणि वृद्धांचा समावेश आहे.
गाझामध्ये आतापर्यंत १० हजारहून नागरिकांचा मृत्यू –
पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गाझामध्ये आतापर्यंत मृतांची संख्या १० हजार ३२८ वर पोहोचली आहे. रविवारपर्यंत जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, इस्रायलच्या हवाई हल्ल्यात पॅलेस्टाईनमधील ९ हजार ७७० लोक मारले गेले आहेत. त्यात जवळपास निम्मी मुले आहेत. यासोबतच गाझामध्ये ८ हजार ६७ लोक जखमी झाले असून, त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. यामध्ये ४ हजार १०४ म्हणजेच निम्म्याहून अधिक बालकांचा समावेश आहे. अजूनही अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली आहे. आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिलेल्या माहितीनुसार १ हजार २५० मुले बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांची संख्या लक्षणीय वाढू शकते.
हमासचे अनेक दहशतवादी मारले गेले –
बीबीसीच्या वृत्तानुसार, इस्रायली लष्कराने (IDF) सांगितले आहे की, आमचे सैनिक गाझा पट्टीच्या आतमध्ये जमिनीवरून हल्ले करत आहेत, ज्यामध्ये हमासचे दहशतवादी मारले गेले आहेत. इस्रायलवर रॉकेट हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या हमासच्या दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी इस्रायली लष्कराने रॉकेट हल्ले केल्याचा दावा इस्रायली सैन्याने केला आहे. यामध्ये हमासचे अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी दावा केला आहे की, त्यांच्या देशाचे सैन्य गाझा शहराच्या मध्यभागी आहे.