विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : कृषि विभाग जिल्हा परिषद गडचिरोली मार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात, विशेषतः अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सन २०२४-२५ पासून बिरसा मुंडा कृषि क्रांती योजने अंतर्गत बोअरवेल (विंधन विहीर) हे घटक समाविष्ठ झाले असून ५० हजार रु. पर्यंत अनुदान देय आहे.
जिल्ह्यात रबी पिक क्षेत्र वाढ तसेच उन्हाळी हंगामात शेतीपिके घ्यावयाची असल्यास सिंचनासाठी पाणी हे प्रमुख उपलब्धता असावी लागते, अल्प भूधारक शेतकऱ्यांना जमीन कमी असल्यामुळे सदर शेतकऱ्यांना पाण्याचा स्त्रोत म्हणून शेततळे किवा विहिरीसाठी जागा उपलब्ध होणे अडचणीचे जाते, तसेच विहीर बांधणीचा खर्च जास्त असल्यामुळे बोअरवेल (विंधन विहीर) या घटकाची शेतकऱ्यांकडून मागणी होती, त्या मागणीचा विचार करून अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजने अंतर्गत बोअरवेल (विंधन विहीर) हे घटक समाविष्ठ करण्यात आले असून त्यास ५० हजार रु. पर्यंत अनुदान देय आहे. तसेच सौर पंप करीता ५० हजार रु. पर्यंत अनुदान देय असून, पॅकेज स्वरूपात बोअरवेल (विंधन विहीर) व सौर पंप साठी १० हजार रु. पर्यंत अनुदान देण्यात येईल.
तरी योजनेचा लाभ घेण्यासाठी www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर जाऊन सदर घटकाला अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना या सदराखालील अर्ज करावा असे आवाहन किरण खोमणे, कृषि विकास अधिकारी जि.प. गडचिरोली व प्रदीप तुमसरे, जिल्हा कृषि अधिकारी (वि.घ.यो) यांनी केले आहे.