Latest Posts

बुटीबोरी-उमरेड रेल्वे मार्ग अपग्रेड : कोळसा वाहतुकीचे प्रमाण आणि गतीही वाढणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : मोठ्या प्रमाणावर कोळसा वाहतुकीसाठी उपयोगात आणला जाणारा बुटीबोरी-उमरेड रेल्वे मार्ग आता अपग्रेड झाला आहे. आवश्यक त्या सुधारणा या जुन्या रेल्वे मार्गावर करण्यात आल्याने आता या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाडीचा वेग दीडपट झाला आहे. परिणामी या रेल्वे मार्गावर कोळसा वाहतुकीचे प्रमाण आणि गतीही वाढणार आहे.

उमरेडला मोठी कोळसा खदान आहे. तेथून निघणारा कोळसा विविध ठिकाणच्या उर्जा प्रकल्प आणि औद्योगिक प्रकल्पासाठी वापरला जातो. उमरेड खदानीतून निघालेला कोळसा नागपूरला आणण्यासाठी बुटीबोरीहून उमरेडला रेल्वे लाईन आहे. ही लाईन जुनी असल्याने या लाईनवर रेल्वेगाडीची गती प्रति तास ५० किलोमीटर एवढी होती. त्यामुळे रोज जास्तीत जास्त जाणाऱ्या ८ जाणाऱ्या आणि ८ येणाऱ्या अशा १६ गाड्यांचेच या रेल्वे मार्गावरून आवागमन होत होते.

मात्र, या मार्गाचे नुतनीकरण केल्यास गाड्यांची संख्या, गती आणि कोळसा आणण्याचे प्रमाण वाढवले जाऊ शकते, असा निष्कर्ष काही महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या पाहणीनंतर नोंदविण्यात आला होता. त्यानुसार, या मार्गावरील पुलांवर असलेले जुने लाकडी स्लीपर काढून त्या जागी उच्च दर्जाचे बीम, स्लिपर टाकण्यात आले. आवश्यक रुंदीकरण, उतार काढण्यात आला. उच्च दर्जाचे ट्रॅक टाकून मानवरहित रेल्वे क्रॉसिंग गेट बंद करण्यात आले. अशा प्रकारे या ट्रॅकचे नुतनीकरण केल्यानंतर या मार्गावर रेल्वेगाडी ५० ऐवजी ७५ किलोमीटर प्रतितास चालविली जाऊ शकते, हे ट्रायलनंतर स्पष्ट झाले. त्यानुसार, आता एकीकडे गाडीचा वेग दीडपट वाढला असून, दुसरीकडे गाड्यांची संख्याही १६ वरून २० ते २४ करण्यावर विचार सुरू आहे. परिणामी कोळसा वाहतुकीचे प्रमाण वाढणार आहे.

Latest Posts

Don't Miss