– पोलीस स्मृती दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन– पोलीस मुख्यालय गडचिरोली व उप-मुख्यालय, प्राणहिता येथे झालेल्या शिबिरात १०७१ रक्तदात्यांनी केले रक्तदान.
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : २१ ऑक्टोंबर हा दिवस संपूर्ण भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून पाळल्या जातो. या दिनानिमित्त आज पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील शहिद स्मारकाला वरिष्ठांनी पुष्पचक्र अर्पण करुन शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. यासोबतच शहिद जवानांच्या स्मृतींना उजाळा देण्याकरिता या दिवसाचे औचित्य साधून आज २१ ऑक्टोबर २०२३ रोजी गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून रोटरी क्लब नागपूर साऊथ ईस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने व शालिनी मेघे हॉस्पीटल, नागपूर, आचार्य विनोबा भावे हॉस्पीटल, सावंगी मेघे व लाईफलाईन ब्लड बँक यांच्या सहकार्याने पोलीस मुख्यालयाच्या परिसरातील शहिद पांडु आलाम सभागृहामध्ये तसेच पोलीस उप-मुख्यालय प्राणहिता येथे भव्य रक्तदान शिबिराचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले.
रक्तदानाला सर्वात मोठे दान मानले जाते. या रक्तदान शिबिरामध्ये गडचिरोली पोलीस दल, सिआरपीएफ, एसआरपीएफचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच पोस्टे/उपपोस्टे/पोमकें स्तरावरुन आलेल्या नागरिक तसेच शहिद फॅमीली यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवून रक्तदान, हेच श्रेष्ठ दान ही सामाजिक भावना उराशी बाळगून एकुण १०७१ उत्साही पोलीस अधिकारी/अंमलदार व नागरीकांनी रक्तदान केले.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले. यासोबतच रक्तदान शिबीरादरम्यान पोलीस अधीक्षक नीलोत्पल. यांनी रक्तदानाचे महत्व पटवून देतांना सांगीतले की, मानवी रक्ताला कुठलाही पर्याय नाही. ज्या समाजात आपण राहतो त्याचे ऋण फेडायची ही एक संधी रक्तदानाने आपल्याला मिळत असते. तसेच समाजाचा एक जबाबदार घटक या नात्याने एक स्वेच्छा रक्तदाता म्हणून सहभागी होवुन आपल्या नातेवाईक व मित्र परिवाराला प्रवृत्त करण्यासाठी पुढाकार घेणेबाबत त्यांनी आवाहन केले. रक्तदान केल्याने त्या रक्ताचा उपयोग होऊन एखाद्या रुग्णाचा जीव वाचविल्याचे व मदत केल्याचे आपणास समाधान मिळते.
सदर आयोजीत रक्तदान शिबीरात पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली मयुर भुजबळ व उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा साहिल झरकर व इतर पोलीस अधिकारी तसेच डॉ. राजीव वर्भे, अध्यक्ष रोटरी क्लब, नागपूर, डॉ. दिव्या राठोड मॅडम, आचार्य विनोबा भावे हॉस्पीटल, सावंगी मेघे, डॉ. ओबेद ओमान, शालीनीताई मेघे हॉस्पीटल, नागपूर हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. धनंजय पाटील, सायबर सेलचे पोउपनि. निलेश वाघ, पोलीस कल्याण शाखेचे पोउपनि. नरेन्द्र पिवाल व प्रोपागंडा व जनसंपर्क शाखेचे पोउपनि. शिवराज लोखंडे व सर्व अंमलदार तसेच पोलीस रुग्णालय, गडचिरोलीच्या संपूर्ण टीमने अथक परिश्रम घेतले.
उपमुख्यालय प्राणहिता येथे झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये अहेरी, भामरागड, जिमलगट्टा, सिरोंचा, एटापल्ली व हेडरी उपविभागामधील अधिकारी अंमलदार व नागरीकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला.
अहेरीच्या रक्तदान शिबिर उद्घाटनप्रसंगी सिआरपीएफ ९ बटालीयनचे कमांडन्ट आर. एस. बाळापूरकर, सिआरपीएफ ३७ बटालीयनचे कमांडन्ट एम. एच. खोब्राागडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजीतकुमार क्षीरसागर व उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, अहेरी पोस्टे प्रभारी अधिकारी मनोज काळबांदे व विशेष अभियान पथक प्राणहिताचे सपोनि. योगीराज जाधव व सपोनि. राहुल देवडे तसेच लाईफलाईन ब्लड बॅकेचे डॉ. हरिश वर्भे हे उपस्थित होते.