विदर्भ न्युज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : विकी कौशलच्या छावा सिनेमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान आणि शौर्यगाथेवर आधारित हा सिनेमा आहे. बॉक्स ऑफिसवरही फक्त छावा सिनेमाचे राज्य पाहायला मिळत आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात गर्दी करत आहेत. जवळपास सगळीकडेच सिनेमाचे शो हाऊसफूल होत आहेत. आता प्रेक्षकांसाठी एक खूशखबर आहे. छावा आता मराठीतही येणार आहे.
सांस्कृतिक मंत्री उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. उदय सामंत यांनी नुकतीच छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची भेट घेतली. छावा सिनेमा मराठीत डब करून प्रदर्शित करण्यात यावा अशी विनंती उदय सामंत यांनी लक्ष्मण उतेकर यांना केली. लक्ष्मण उतेकर यांनी ही विनंती मान्य केली असून लवकरच हा सिनेमा मराठीतही प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे. याबाबत उदय सामंत यांनी ट्वीट केले आहे.
आज छावा चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीयुत लक्ष्मण उतेकर यांची भेट झाली. छावा चित्रपट मराठी भाषेतून डब करून प्रदर्शित करावा ही मराठी भाषा मंत्री म्हणून विनंती केली. ती त्यांनी मान्य केली. सोबत अमेय खोपकर उपस्थित होते, असे उदय सामंत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
छावा सिनेमात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना आहे. अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. संतोष जुवेकर, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये, शुभंकर एकबोटे हे मराठी कलाकारही सिनेमात आहेत.