Latest Posts

गडचिरोलीच्या कोर्ट चौकाला आद्य क्रांतिकारक कुमराम भीम यांचे नाव

– खा.अशोक नेते यांच्या हस्ते फलकाचे अनावरण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : शहरातील कॅाम्प्लेक्स भागात असलेल्या जिल्हा न्यायालयाच्या चौकाला थोर आद्य क्रांतिकारक, ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणाची आहुती दिली ते स्वातंत्र्य सेनानी कुमराम भीम यांचे नाव देण्यात आले आहे. खासदार अशोक नेते यांच्या हस्ते चौकाच्या या नवीन नामफलकाचे अनावरण करण्यात आले. तत्पूर्वी त्यांच्या प्रतिमेचे व थोर महापुरुषांचे विधिवत पूजन करून फलकाची फित कापण्यात आली.

कुमराम भीम यांच्या लढ्यावर नुकताच आर.आर.आर.(RRR) हा चित्रपट तयार झाला आहे. त्यांच्या योगदानाचा इतिहास गडचिरोली जिल्हावासियांना माहित व्हावा आणि त्यांचे स्मरण प्रेरणादायी ठरावे यासाठी चौकाचे हे नामकरण करण्यात आले. १७ डिसेंबर रोजी आदिवासी युवकांनी एकत्रित येऊन या सोहळ्याचे आयोजन केले होते.

यावेळी खासदार अशोक नेते यांनी आपल्या भावना व्यक्त करताना, जिल्हा न्यायालयाच्या परिसरात जिल्हाभरातील नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे या चौकाचे नामकरण आद्य क्रांतिकारक कुमराम भीम या नावाने केल्यामुळे त्यांचे नाव सर्वांपर्यंत पोहोचेल. त्यांनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपल्याला मुक्त करण्यासाठी दिलेल्या योगदानाचे महत्व सर्वांना कळेल, असा विश्वास व्यक्त करत या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी कुमराम भीम अमर रहे… असा जयघोषही करण्यात आला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते मेश्राम, सतिश कुसराम व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, चंद्रपुर युवा जिल्हाध्यक्ष अतुल कोडापे, पोलीस बॉइज असोसिएशन चे गिरीश कोरामी, भाजपाचे युवा नेते आशिष कोडापे, आकाश ढाली, प्रांतोश विश्वास, अक्षय मडावी, डेवीड पेंद्राम, उदय नरोटे, सचिन भलावी, हसीना कांदो, शिवानी तलांडे, महाराष्ट्र सोशल मिडिया सेलचे आनंद खजांजी आदी मोठया संख्येने आदिवासी बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss