– शेतकऱ्या मध्ये दहशतीचे वातावरण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : तालुक्यातील नांदगाव पोडे शेतशिवरात इरई वर्धा नदी संगम परिसराजवळ वाघाने गुरूवार ११ एप्रिलला विलास खापने यांच्या गायीवर सायंकाळी ४ वाजता जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात गाय गंभीर जखमी झाली. ती कशीबशी वाघाच्या तावडीतून सुटून घरी आली तेंव्हा गाय मालकांना लक्षात आले. त्यांनी तातडीने पशु वैद्याला बोलवले त्यांनी त्यावर उपचार केला. परंतु घाव खूप खोल व संवेदनशील असल्याने गाय वाचण्याची शाश्वता त्यांनी दिली नाही. परिसरात आता वाघाचे अस्तित्व निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नांदगाव पोडे शेत शिवारामध्ये इरई वर्धा नदीच्या संगम परिसराजवळ वाघाचे वास्तव्य आढळल्याने व त्यांनी एका गाईवर हल्ला केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी शेतकरी शेतात जाण्यासाठी घाबरू लागले आहे. थोडक्यात वाघाचे हल्ल्यातून बचावलेली गायची माहिती गायमालक विलास खापणे यांनी वन विभागाला दिली. वनरक्षक वर्षा पिपरे यांनी याबाबतचा पंचनामा केला व नुकसान भरपाई साठी गायची वैद्यकिय रिपोर्ट मागवली आहे. जंगलातील पाणवठे आटल्यामुळे वाघ व इतर जंगली प्राणी तहान भागवण्यासाठी नदीकडे येवू लागले आहे व इथेच आयती शिकार मिळत असल्याने बस्तान मांडला असावा असा अंदाज जुन्या जाणकारांनी केला आहे. करीता शेतात जातानी आता खबरदारी ची गरज आहे तसेच वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी नांदगाव पोडे येथील शेतकऱ्यांनी वनविभागाला केली आहे.