विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : रानटी डुकरांची शिकार करण्यासाठी विद्युत प्रवाह सोडला; पण यात डुक्कर न अडकता वाघ अडकून त्याची शिकार झाली. ही घटना चातगाव वनपरिक्षेत्रातील अमिर्झा बिटात मंगळवार २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली.
गडचिरोली वन विभागांतर्गत येणाऱ्या चातगाव वन क्षेत्रात गेल्या अनेक महिन्यांपासून वाघाचा वावर आहे. लोकांना या वाघाचे अधूनमधून दर्शन होत होते. अशातच मंगळवार २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास गुराखी गुरे चालत असताना वाघ मृतावस्थेत दिसला. त्याने काही लोकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर वनाधिकाऱ्यांना कळविण्यात आले. वनविभागाचे अधिकारी सकाळी १० वाजतापर्यंत घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनाम्याची कार्यवाही केली. दरम्यान गडचिरोली वन विभागाचे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली.
यावेळी मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे व वन विभागाने अधिकारी उपस्थित होते.
तीन पंजे व डोक्याचा भाग गायब :
करंटने शिकार झालेल्या वाघाचे तीन पंजे तसेच वाघाच्या डोक्याचा काही भाग गायब झाला आहे. पुढचे दोन्ही पंजे व मागील डावा पंजा अज्ञात लोकांनी गायब केला.
प्रथमदर्शनी वाघाला करंट लावून मारल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणात नेमका कोणाचा हात आहे, यासह विविध बाबी चौकशीनंतरच स्पष्ट होतील. – मिलिश शर्मा, उपवनसंरक्षक गडचिरोली.