– ध्येय गाठायचे असेल तर आत्मविश्वास आवश्यक : माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम
– दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकाचे थरावर थर, व्येकंटरावपेठा येथील गोविंदा पथक विजयी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : दहीहंडी उत्सवात गोविंद पथक थरावर थर लावत एकदा नव्हे तर अनेकदा प्रयत्न करून अखेर दहीहंडी फोडतात. त्यांचा ध्येय निश्चित असतो. प्रचंड आत्मविश्वास आणि प्रयत्न असतात त्यामुळेच ते शक्य होते. म्हणून प्रत्येकाला आपले ध्येय गाठायचे असेल तर स्वतःमध्ये आत्मविश्वास असणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले.
अहेरी येथील कै. विश्वेश्वरराव महाराज (गांधी) चौक येथे विश्व हिंदू परिषद स्थापना दिनी श्रीकृष्ण जन्मोतस्व समिती, बजरंग दल, विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा समिती अहेरी द्वारा आयोजित भव्य दहीहंडी स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून विश्व हिंदू परिषद भद्रावती प्रखंडचे अध्यक्ष विवेक सरपटवार तसेच भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलतांना भारत मातेचे रक्षण करून देशाला पुढे घेऊन जाण्याचा काम आपल्या सर्वांना करायचा आहे. एकमेकांना साथ देऊन पुढे जायचे आहे. एवढेच नव्हे तर आपल्या गावाला, आपल्या क्षेत्राला पुढे घेऊन जातांना गोविंदा पथक प्रमाणे एक एक थराला आधार देऊन उंच शिखर गाठतात अगदी त्याच प्रमाणे आपल्या एकमेकांना साथ द्यायचं आहे. तेव्हाच आपल्याला ध्येय गाठता येणार आहे. विशेष म्हणजे गोविंदा पथकात संघ भावना असते, एकमेकाशी संवाद असतो, एकात्मतेची भावना असते, अशाच पद्धतीने एकसंघ होऊन पुढे गेल्यास यश निश्चित असते असेही ते म्हणाले. तर सिरोंचा येथील एक प्रसंग आठवण करून देत त्यांनी युवतींना गोविंदा पथकात सहभाग होण्यासाठी आवाहन केले. सोबतच विश्व हिंदू परिषदेचे ६० पूर्ण झाल्याबद्दलही त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिले.
या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ३१ हजार रुपये श्रीराम गोविंदा पथक, व्येकंटरावपेठा ह्यांना राजेंचा हस्ते ह्यावेळी देण्यात आले. या स्पर्धेसाठी अहेरी शहर तथा परिसरातील जनतेची तुडुंब गर्दी झाली होती.