विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील विशेष वैद्यकीय कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या आयुष्यात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. गोरगरीब- गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. यानुसार कक्षाने सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत अवघ्या ८ महिन्यात एकूण १२ कोटी ७३ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.
माहे, जानेवारी, २०२४ पासून ते माहे, ऑगस्ट २०२४ पर्यंत कक्षाच्या माध्यमातून ३२३ रुग्णांना मदत झाली आहे. ह्रदय रोग, कर्करोग, यकृत प्रत्यारोपण, मुत्रपिंड प्रत्यारोपण, बोनमॅरो ट्रान्सप्लांट, फुफुसाचे आजार, अस्थिरोग अवयव पुनर्रस्थापना शस्त्रक्रीया (Replacement Surgeries), यासारख्या गंभीर व सर्व सामन्यांच्या आवाक्याबाहेर असलेल्या आजारांच्या शस्त्रक्रीयेंचा समावेश आहे. गोर-गरीब रुग्णांनी धर्मादाय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री मदत कक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.
निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांवर मोफत व सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार मिळण्याकरिता उच्च न्यायालय, मुंबई यांनी योजना तयार केली आहे. त्यानुसार, प्रत्येक धर्मादाय रूग्णालयाने त्यांच्या रूग्णालयातील एकूण खाटांपैकी १० टक्के खाटा निर्धन रूग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी व १० टक्के खाटा दुर्बल घटकातील रूग्णांवर सवलतीच्या दराने उपचार करण्यासाठी राखून ठेवणे या धर्मादाय रूग्णालयांना बंधनकारक आहे. या योजनेची प्रभावी व पारदर्शी अंमलबाजावणी होत नसल्याने गोर-गरीब रुग्णांना त्याचा लाभ मिळत नसल्याचे निदर्शनास आले होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी विधि व न्याय विभागाचा कार्यभार घेतल्यानंतर या योजनेची प्रभावी व पारदर्शी अंमलबजावणी करण्याबाबत पाऊले उचलली आहे. त्याचाच भाग म्हणून शासनाच्या ३१ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयांतर्गत राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
राज्यात धर्मादाय अंतर्गत सुमारे ४६८ रुग्णालये नोंदणीकृत असून त्यामधील सुमारे १२ हजार बेड्स निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांकरीता उपलब्ध आहेत. यामध्ये कोकीळाबेन, मुंबई, एन.एन. रिलायन्स, मुंबई, सह्याद्री हॉस्पीटल, पुणे, दिनानाथ मंगेशकर रुग्णालय, पुणे इत्यादी नामांकीत रुग्णालयांचा समावेश असून सर्वधर्मादाय योजनेची अधिक प्रभावी अंमलबाजवणी कशी करता येईल. यासाठी कक्षामार्फत मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर येथे विभागीय कार्यशाळेचे आयोजन देखील करण्यात आले होते. या मध्ये राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांनी उत्साहाने सहभाग घेतला.
निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांना या सवलतीच्या खाटा पारदर्शकपणे उपलब्ध होण्याकरीता राज्यस्तरीय विशेष मदत कक्षासाठी ऑनलाईन प्रणाली विकसीत करण्याचे काम प्रगतीपथावर असून लकरच सदर प्रणाली सर्वसामान्यांच्या सेवेत कार्यरत होणार आहे. त्यामुळे रुग्णांना अर्ज करणे आणखी सोपे होणार असून योजनेची पारदर्शी अंमलबजावणी होण्यास मदत होणार आहे.
केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या विविध योजना यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर या धर्मादाय योजनेस उपचाराच्या खर्चाची कोणतीही मर्यादा नसल्याने कॅन्सर, लिव्हर ट्रान्सप्लांट, ह्दय प्रत्यारोपन अशा महागड्या शस्त्रक्रीया या योजनेतून निर्धन गटातील रुग्णास मोफत करण्यात येतात. त्यामुळे गोर-गरीब रुग्णांकरीता ही योजना वरदान ठरली आहे.
सद्यस्थितीत कक्षाचे कामकाज ऑफलाईन पध्दतीने सरु असुन निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना मदती मिळणे राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षास अर्जासह कागदपत्रे charityhelp.dcmo @maharashtra.gov.in या ईमेल आयडी वर मेल करु शकतात किंवा प्रत्यक्ष कक्षात आणून देवू शकतात.
धर्मादाय रूग्णालयातील बेड मिळण्याकरिता रूग्णास त्याचा, नातेवाईकांचा अर्ज, लोकप्रतिनीधींचे पत्र, आधार कार्ड / ओळखपत्र, रेशनकार्ड / तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन आवश्यक आहे.
राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष पुर्ण क्षमतेने कार्यरत योजनेचा लाभ घेण्याकरीता निर्धन व दुर्बल रूग्णांनी लाभ घेण्यात यावा, असे आवाहन कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.