– खा. अशोक नेते यांच्या सूचनेवरून डीपीसी बैठकीत ठराव
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात येणाऱ्या सावली तालुक्यातील देवटोकला क वर्ग पर्यटनस्थळ, तर चिमूर तालुक्यातील रामदेगी या स्थळाला क वर्गातून ब वर्ग धार्मिक पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पारित करण्यात आला. खासदार अशोक नेते यांच्या सूचनेनुसार हा ठराव करण्यात आला.
चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरूवारी (४) चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झाली. वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य विकासमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला खा. अशोक नेते यांच्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते.
यावेळी खा. नेते यांनी त्यांच्या लोकसभा क्षेत्रातील सावली, ब्रम्हपुरी आणि चिमूर तालुक्यातील विकासात्मक कामांचे मुद्दे बैठकीत मांडले. यावेळी शेकडो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या सावली तालुक्यातील देवटोकला क वर्ग धार्मिक पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. याशिवाय चिमूर तालुक्यातील रामदेगी या स्थळाला क वर्गामधून ब वर्गाचा दर्जा देण्याचा ठराव खा. नेते यांनी मांडला. तो मंजूर केला असून आता तो प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी जाणार आहे. यामुळे या दोन्ही स्थळांच्या ठिकाणी विविध सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी निधी मिळून त्या स्थळांचा विकास होणार आहे.
शेतकऱ्यांना भरपाई आणि रस्ते दुरूस्तीवर चर्चा –
सावली तालुक्यात अवकाळी पावसामुळे मका या पिकाची मोठ्या प्रमाणात हाणी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तसेच चिमूर तालुक्यात अवकाळी पावसाने सोयाबीन पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यातील नुकसानभरपाईची ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली, पण उर्वरित ५० टक्के रक्कम अजून मिळालेली नाही. ती लवकरात लवकर देण्यात यावी, तसेच सावली तालुक्यात सावली- पारडी- हरणघाट या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात होतात. त्यामुळे लवकरात लवकर या कामांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी सूचना यावेळी खा. नेते यांनी केली.