विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : जिल्ह्यातील दुर्गम भागातील दिव्यांग कर्णबधीर शाळेतील मुलींना वसतिगृहाची पक्की इमारत नव्हती, आता त्यांनी सर्व सोईनीयुक्त अशी इमारत मिळेल. त्यामुळे त्यांच्या गुणवत्तेत निश्चितच वाढ होणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी सांगितले.
दिव्यांग कर्णबधीर मुलींच्या वसतिगृहाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. एम.एल. पेंडसे फॉऊंडेशन मुंबईचे विश्वस्त ॲड शशांक मनोहर, वर्षा मनोहर, सत्यनारायण भारतिया, जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर, शाळेच्या प्राचार्या डॉ. सांगोळे यावेळी उपस्थित होत्या. जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी मुलींच्या वसतिगृहाच्या शाळेचे भूमीपूजन केले.
दिव्यांगासाठी नागपूरातील एकमेव शाळा अशी जूनी ख्याती असलेल्या या शाळेमुळे दिव्यांग मुलींच्या सूप्त गुणांना वाव मिळेल. सोबतच त्यांचे जीवन सुकर होईल, असे श्रीमती शर्मा म्हणाल्या.
सामाजिक कार्याच्या जाणिवेतून हे कार्य करीत असल्याचे शशांक मनोहर यांनी सांगितले. आपल्याला समाजाचे काही देणे असते, त्यातूनच ही परतफेड आहे. दिव्यांगाच्या मदतीसाठी आपण सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सांगोळे यांनी केले तर संचालन व आभार शिक्षिका उत्तरा पटवर्धन यांनी केले. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर अप्रतिम नृत्य सादर केले. या कार्यक्रमास शाळेचे शिक्षक, शिक्षीका, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.