Latest Posts

आरबीआयच्या निर्णयामुळे खळबळ : एडलवाईजच्या दोन कंपन्यांविरोधात कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : नियमांचे उल्लंघन केल्यावर भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) थेट कारवाईचा बडगा उगारते. एडलवाईज उद्योग समूहावरही आरबीआयने अशीच कारवाई केली आहे. या ग्रुपरच्या ईसीएल फायनान्स (ECL Finance) आणि एडलवाईज असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (Edelweiss Asset Reconstruction Company) या दोन कंपन्यांच्या कामकाजावर प्रतिबंध आणले आहेत.

या दोन्ही कंपन्यांच्या कामकाजात मोठा गैरव्यवहार झाला असून त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे, असे आरबीआयने २९ मे ला सांगितले आहे.

तत्काळ प्रभावाने आरबीआयचा आदेश लागू –
आरबीआयने जारी केलेला हा आदेश तत्काळ प्रभावाने लागू झाला आहे. आरबीआयने या दोन्ही कंपन्यांना व्यवहार करण्यास मज्जाव केला आहे. यातील ईसीएल फायनान्स या कंपनीला होलसेल ट्रांजेक्शन करता येणार नाहीत. या कंपनीला फक्त रिपेमेंट आणि अकाउंट क्लोजरची कारवाईचा व्यवहार करता येईल. तर एडलवाईज एआरसीला सिक्योरिटी रेसिप्ट्स तसेच फायनान्शियल असेट्सच्या व्यवहारावर बंदी घालण्यात आली आहे. तपासात या दोन्ही कंपन्यांनी अनेक गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे. या दोन्ही कंपन्यांनी सिक्योरिटी रेसिप्ट्चे चुकीचे मूल्यांकन केले होते. तसेच डेट बुकची चुकीची माहिती देणे, शेअर्सच्या बदल्यात कर्ज देताना नियमांत बदल करणे, सेंट्रल डिपॉझिटरीला चुकीची माहिती देणे, केवायसी गाईडलाईन्सचे योग्य पालन केलेले नाही, असे आरबीआयने म्हटले आहे.
आरबीआयने या दोन्ही कंपन्यांना त्यांच्या कामकाजात सुधारणा करण्याचा सल्ला दिला होता. पण या कंपन्यांकडून नियमांचे उल्लंघन करण्यासाठी वेगवेगळे नवे मार्ग शोधले जात होते. आम्ही गेल्या काही महिन्यांत या कंपन्यांचे वरिष्ठ व्यवस्थापक आणि ऑडिटर्स यांच्याशी चर्चा केली. पण यातून काहीही साध्य झाले नाही. त्यामुळे आम्ही या दोन्ही कंपन्यांच्या कारभारावर बंदी घातली आहे, असे आरबीआयने सांगितले आहे.

या वर्षी अनेक संस्थांवर बंदी –
आरबीआयने या वर्षी अनेक संस्थांवर बंदी घातली आहे. मनी कन्ट्रोलच्या रिपोर्टनुसार या वर्षाच्या सुरुवातीलाच आरबीआयने जेएम फायनान्शियल प्रोडक्ट्स (JM Financial) आणि आयआयएफएल फाइनान्स (IIFL Finance) या दोन एनबीएफसीवर कारवाई केली होती. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पेटीएम पेमेंट्स बँकेवरही (Paytm Payments Bank) आरबीआयने कारवाई केलेली आहे.

Latest Posts

Don't Miss