विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : ‘इअर टॅगिंग’ केल्याशिवाय पशुधनाची खरेदी-विक्री करण्यास १ जून २०२४ पासून प्रतिबंध करण्यात आला आहे. पशुधनाची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय खरेदी किंवा विक्री करता येणार नाही. तसेच पशुधनास पशुवैद्यकीय दवाखान्यामधून पशुवैद्यकीय सेवाही दिली जाणार नाही.
केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने नॅशनल डिजिटल लाइव्ह स्टॉक मिशन भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीत ‘इअर टॅगिंग’ची नोंद घेण्यात येत आहे. यात जन्म-मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतरण यांचा समावेश आहे.
सर्व पशुवैद्यकीय विभागामार्फत पशुधनाच्या कानात ‘टॅग’ लावून त्याची भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. शासनाच्या या निर्णयामुळे सर्व पशुधनाची सर्वंकष माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. जेणेकरून पशुधनातील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्याकरिता मदत होणार आहे.
मालकी हस्तांतरण नोंदी करा :
‘इअर टॅगिंग’ नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडा बाजार व गावागावातील खरेदी-विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे ‘इअर टॅगिंग’ नसलेले पशुधन बाजार समिती आणले जाणार नाही व त्यांची खरेदी-विक्री होणार नाही, याची दक्षता संबंधित बाजार समितीने घ्यायची आहे. पशुधनाच्या मालकी हस्तांतरण बाबतच्या नोंदी संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अद्ययावत करून घेण्याची जबाबदारी संबंधित पशुपालकांची राहणार आहे.
तर होणार कारवाई :
जाणीवपूर्वक नष्ट केलेल्या पशुधनाची ‘इअर टॅगिंग व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय त्यांना केंद्र व राज्य शासनाकडून देय आर्थिक साहाय्य मिळणार नाही. नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशुंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास ‘इअर टॅगिंग’ केलेली नसल्यास भरपाईची रक्कम मिळणार नाही. पशुधनाची वाहतूकही करता येणार नाही. तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतूकदारांवर कारवाई करण्यात येणार आहे.