– उमेदवारांना खर्च व लेख्यांबाबत प्रशिक्षण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा(Wardha) : भारत निवडणूक आयोगाने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना खर्चाची मर्यादा ठरवून दिली आहे. निवडणूक आयोगाने नेमून दिलेल्या खर्चाच्या मर्यादांचे पालन उमेदवारांनी करावे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांनी खर्चाची अचूक माहिती भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या विहित पद्धतीनुसार, कालमर्यादेत खर्च सनियंत्रण कक्षाकडे सादर करावी, अशा सूचना खर्च निरीक्षक खर्च निरीक्षक ग्यानेंद्र कुमार त्रिपाठी यांनी दिल्या.
विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे खर्च व लेखे ठेवण्याबाबतचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी तथा खर्च नोडल अधिकारी सुरज बारापात्रे, चारही विधानसभा मतदार संघातील खर्चविषयक पथकातील अधिकारी यांच्यासह निवडणूक लढविणारे उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
निवडणुक आयोगाने विधानसभा निवडणूकीकरीता उमेदवारांना ४० लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा ठरवून दिली आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्ष व उमेदवाराचा होणारा खर्च दैनंदिन नोंदविणे आवश्यक असून होणारे सर्व व्यवहार धनादेशाद्वारे करा. सभा, प्रचार साहित्य, वाहन, अतिमहत्वाच्या नेत्यांच्या सभा, पोस्टर, बॅनर आदींचा खर्च निवडणूक खर्चात नोंदविणे गरजेचे आहे. नोंदविलेल्या खर्च व लेखे हिशोब तपासणी संबंधीत विधानसभा मतदार संघ स्तरावर करण्यात येणार आहे. यासाठी विधानसभा निहाय तारीख वेळ ठरवून दिलेल्या असून यावेळेत खर्चाच्या हिशोब लेखे तपासणी करीता उपस्थित राहावे, असेही ग्यानेंद्र कुमार त्रिपाठी यावेळी म्हणाले.
खर्च विषयक उमेदवारांना काही अडचणी असल्यास खर्च सनियंत्रण कक्षाला संपर्क करा, असे आवाहन खर्च निरीक्षक ग्यानेंद्र कुमार त्रिपाठी यांनी यावेळी केले.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा या चारही विधानसभा मतदार संघातून निवडणूक रिंगणात असणाऱ्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले आहे. उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना निवडणूक खर्चाचे प्रकार, लोकप्रतिनिधी कायदा १९५१, उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा, उमेदवारांनी खर्च करण्याच्या पद्धती, उमेदवाराकडून ठेवण्यात येणारी निवडणूक खर्चाची नोंदवही, निवडणूक खर्चाचे प्रमाणके, बँक नोंदवही यांची माहिती अद्ययावत असणे आवश्यक आहे.
चिन्ह वाटपानंतर निवडणूक खर्चासंदर्भात आयोगाच्या सर्व कायदेशीर तरतूदी आणि सूचना, त्यांचे पालन न केल्यास होणारे परिणाम समजावून सांगण्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
प्रशिक्षणात स्थानिक निधी लेखाचे सहाय्यक संचालक तथा जिल्हास्तरीय निवडणूक खर्च पथकातील अधिकारी क्षिलसागर चहांदे यांनी उपस्थित निवडणूक लढविणारे उमेदवार व प्रतिनिधींना निवडणूकीत करण्यात येणा-या खर्चाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.