Latest Posts

वीज बिलाच्या तक्रारी करा आता मोबाइल अँपवर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : विजेसंदर्भातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हवे असल्यास आता महावितरणला फोन करण्याची गरज नाही. महावितरणने यासाठी ॲप आणले असून, यावर ग्राहकाला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. तसेच महावितरणच्या महाडिस्क या संकेतस्थळावर ऊर्जा चॅट बॉट (आर्टिफिशल इंटेलिजेन्स प्रणीत) सुरू करण्यात आला आहे. यामुळे वीज ग्राहकांना नवीन कनेक्शन, वीजपुरवठा खंडित, वारंवार विजेची जा-ये किंवा महिन्याचे वीज बिल जास्त आल्यास तक्रार करता येणार आहे.

राज्य विद्युत नियामक आयोगाच्या मान्यतेने नवीन चालू आर्थिक वर्षापासून सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांचे वीजबिल वाढविण्यात आले आहे. एप्रिल महिन्याचे वीजबिल मागील काही दिवसांपासून ग्राहकांच्या खात्यावर वर्ग होत आहेत. मात्र, सरासरी ५० ते २०० रुपयांपर्यंत वीजबिल वाढीव येत असल्याने ग्राहकांत संभ्रम निर्माण होत आहे. अनेकांना एकदम वाढीव वीज बिल आल्याने महावितरणच्या चुकीने बिल वाढून आले असल्याचे वाटत आहे. यामुळे महावितरणकडे यासंदर्भात तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरणने महावितरण ॲप सुरू केले आहे. या ॲपवर वाढीव वीज बिलाच्या तक्रारी आहेत. दर वाढल्याने बिल जास्त येत असल्याचे सांगण्यात येत आहे. एप्रिल महिन्याचे बील मोठ्या प्रमाणात आले आहे. मे महिन्यात तर विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होत असते.

जिल्ह्यात महावितरणचे ग्राहक किती?
घरगुती : ५२ हजार ३९८
वाणिज्य : ३ हजार ८०६
औद्योगिक : ५५७
कृषी : ५६ हजार ७६१

कोणकोणती माहिती मिळणार?
नवीन वीजजोडणी, वीजबिल भरणा, तक्रार निवारण आदींबाबत माहिती घेण्याची सोय उपलब्ध आहे. विविध शुल्कांचा ऑनलाइन भरणा, स्वतः मीटर वाचन व सबमिशन, गो-ग्रीन नोंदणी, वीजवापर व बिलाचा हिशोच आदींबाबत ऊर्जा चॅट बॉट थेट मदत करीत आहे.

वेबसाईट : कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून वीजग्राहकांच्या संवादपर मदतीसाठी ऊर्जा चॅट बॉट महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. इंग्रजी व मराठी भाषेतील या चॅट बॉटद्वारे महावितरणच्या विविध सेवांबाबत ग्राहकांना प्रश्न विचारता येत आहेत.

मोबाईल ॲप : तसेच महावितरण ॲप देखील सुरू करण्यात आलेले आहे. याअंतर्गत ग्राहकांना घरबसल्या या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

Latest Posts

Don't Miss