Latest Posts

आरटीईकरिता इंग्रजी माध्यमांच्या शाळेतही मिळणार प्रवेश 

– नव्याने प्रक्रियेच्या हालचाली
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नांदेड [Nanded] : महाराष्ट्र शासनाकडून या शैक्षणिक वर्षासाठी राबविण्यात येत असलेली २५ टक्के आरटीई प्रवेश प्रक्रिया उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविली आहे. त्यामुळे आता नव्याने जिल्ह्यातील खासगी, स्वंयअर्थसहाय्यित इंग्रजी शाळांमध्ये बालकांना मोफत प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमांतर्गत २५ टक्के प्रवेश दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या बालकांसाठी इयत्ता पहिली व पूर्व प्राथमिक स्तरावर मोफत दिले जातात. दरवर्षी इंग्रजी शाळांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबविली जायची. पण शासनाला कोट्यवधी रुपये इंग्रजी शाळांना फिसच्या मोबदल्यात द्यावे लागत असल्याने यातून पळवाट काढण्यासाठी या वर्षीपासून ही प्रक्रिया केवळ सरकारी व अनुदानित शाळांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, या निर्णयाला राज्यभरातून मोठा विरोध झाला.

या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. ६ मे २०२४ रोजी उच्च न्यायालयासमोर सुनावणी करण्यात आली होती. सदर सुनावणीवेळी न्यायालयाने ९ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या अधिसूचनेस स्थगिती दिली आहे. तसेच शासनाने निर्गमित केलेल्या परिपत्रकामध्ये सुधारणा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया नव्याने राबविण्याबाबतचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालकाने सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सन २०२४-२५ ची आरटीई प्रवेश प्रक्रिया नियमानुसार राबविण्यासाठी आवश्यक ते बदल पोर्टलवर करण्यात येतील. तसेच ६ मार्च व ३ एप्रिल २०२४ रोजीची परिपत्रके रद्द करून स्वंयअर्थसहाय्यित शाळा, पोलिस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानित) आणि महानगरपालिका शाळा (स्वंयअर्थसहाय्यित शाळा) यांचा समावेश करून आरटीई प्रवेश प्रक्रिया नव्याने राबविण्यात येणार आहे. सध्या जिल्ह्यातील २७८४ जिल्हा परिषद, मनपा व अनुदानित शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होती. पण, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता इंग्रजी माध्यमांच्या जिल्ह्यातील २३४ अथवा त्यापेक्षा अधिक शाळांमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया दोन दिवसांत सुरू होईल, असे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात आले होते ५७६ ऑनलाइन अर्ज –
जिल्ह्यात यावर्षी राबविण्यात येत असलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आजपर्यंत जिल्ह्यातून ५७६ ऑनलाइन अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. पण, त्यानंतर प्रवेश प्रक्रियेचे तळ्यातमळ्यात असल्याने आरटीईचे पोर्टल शासनाने बंद केलेले आहे.

गतवर्षी २३४ शाळांत १ हजार ७८५ प्रवेश –
गतवर्षी जिल्ह्यात आरटीईअंतर्गत विविध इंग्रजी माध्यमांच्या २३४ शाळांमध्ये तब्बल २ हजार २०० जागा ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी १ हजार ७८५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले होते. तर ४१५ जागा रिक्त राहिल्या होत्या.

Latest Posts

Don't Miss