– प्रतिस्पर्धी उमेदवारांचे मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचे मार्गदर्शन तथा योग्य तो नियोजन केल्याने गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठी व मध्यवर्ती ग्रामपंचायत असलेल्या आल्लापल्ली येथील पेसा (ग्रामकोष) समितीचा अध्यक्षपदी दिपक तोगरवार यांची तर सचिव पदी मीना सल्लम यांची मंगळवारी आलापल्ली क्रीडा संकुल येथे झालेल्या ग्राम पंचायतचा ग्रामसभेत बहुमताने निवड करण्यात आले.
विशेष म्हणजे या आधी पेसा कमेटीच्या निवडीसाठी दोन वेळा ग्रामसभा बोलावून ही निर्णय न झाल्यामुळे तहकूब करण्यात आली होती. आलापल्लीच्या इतिहासात पहिल्यांदाच पेसा समिती निवडीसाठी ग्रामपंचायत सभागृहाबाहेर ग्रामसभा बोलावून मोठा पोलीस बंदोबस्त लावून ही निवडीची प्रक्रिया पार पाडावी लागली. या निवडीसाठी मोठ्या प्रमाणात गाड्यांची व्यवस्था करून ग्रामसभेला मोठ्या प्रमाणात युवक, महिला व पुरुषांना आपल्या पारड्यात वजन टाकण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करून लवाजमा आणला होता. नेत्यांसाठी मोठ्या प्रतिष्ठेची ही निवडणूक झाली होती.
मोठ्या गदारोळात ही सभा पार पडली. यामध्ये युवा कार्यकर्ता दिपक तोगरवार यांची अध्यक्ष पदी तर सचिव पदी मीना सल्लम यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांची अहेरी येथील रुक्मिणी महालात भेट घेतली.
यावेळी राजेंनी पुष्पगुच्छ देऊन दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करीत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सायंकाळी आलापल्लीत विजयी मिरवणूक काढून आतिषबाजी करण्यात आली.