Latest Posts

शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी सरसावले पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

– सोयाबीन, कापसाच्या पिकांच्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : पावसातील खंड, अनियमित हवामान यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन व कापसाच्या पिकांवर मोठ्या प्रमाणावर रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे पिकांची मोठी हानी झाली. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासादायक नुकसान भरपाईची गरज असून यासंदर्भात निर्देश देण्याबाबत राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १७ नोव्हेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र देत मागणी केली आहे.

सोयाबीन पिकावर मुळकुज, खोडकुज, रायझेक्टानिया एरीयल ब्लाईट आदी रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. या पिकांची मुनगंटीवार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती. पिकांच्या नुकसानाची कारणमिमांसा तसेच भविष्यात उपाययोजना करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ज्ञांनी संयुक्त पाहणीचे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ज्ञांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतशिवारात जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीच्या आधारे तज्ज्ञांनी शासनाला अहवाल सादर केला आहे.

आपत्तीच्या या काळात शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे, असे नमूद करीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पंचनाम्यांच्या अहवालाच्या आधारावर चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासादायक नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Latest Posts

Don't Miss