विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड (Bhamragad) : तालुक्यातील लोकबिरादरी आश्रम शाळा, हेमलकसा येथे १ ते ७ ऑक्टोबर २०२३ दरम्यान सातही दिवशी विविध कार्यक्रम आयोजित करून वन्यजीव संरक्षण सप्ताह साजरा करण्यात आला.
वनपरिक्षेत्र कार्यालय ताडगाव व लोकबिरादरी आश्रम शाळा हेमलकसा यांचे संयुक्त विद्यमाने १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान १ तारखेला आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी श्रमदान करून स्वच्छता मोहीम राबवली. २ ऑक्टोबरला म. गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करून नगरसेविका राणी मुक्कावार यांचे उपस्थितीत हेमलकसा टोला परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ३ ऑक्टोबरला वन्यजीवांचे महत्त्व व अधिवास यांवर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये एकलव्य मॉडेल स्कूल भामरागड व ताडगाव, शासकीय आश्रम शाळा ताडगाव, लोकबिरादरी आश्रम शाळा हेमलकसा येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ४ ऑक्टोबरला, मानव वन्यजीव संघर्ष, जैवविविधतेचे महत्त्व, प्लास्टिकचे दुष्परिणाम, वन्यजीवांचे महत्त्व या विषयांवर गटनिहाय निबंध स्पर्धा घेण्यात आली. ५ ऑक्टोबर, वन्यजीवांचे रक्षण, प्लास्टिकचे दुष्परिणाम यांवर भाषण व काव्यलेखन स्पर्धा घेण्यात आली. ६ ऑक्टोबरला लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेतदादा आमटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व जंगल आणि वन्यजीव संरक्षणाचा संदेश दिला. ७ ऑक्टोबरला वन्यजीव संरक्षण सप्ताहाची सांगता करिता एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्रीराम झोडे हे होते. प्रमुख अतिथी ताडगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी डी.जी. रामटेके, क्षेत्रसहाय्यक आर.डी. चौधरी, लोकबिरादरी आश्रम शाळेचे माजी विद्यार्थी व वनरक्षक प्रमोद ओक्सा, दिपा कुरसामी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर सप्ताहात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेंतील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. गिरीष कुलकर्णी यांनी केले. वन्यजीव संरक्षण सप्ताहाचे यशस्वीतेसाठी तुषार कापगते, शिल्पा चांगण, विजया किरमिरवार, लीलाधर कसारे, खुशाल पवार, जमीर शेख, सुरेश गुट्टेवार, वर्षा कुदळे, जयश्री शेंडे, परमात्मा पंधरे, हिना गुट्टेवार, अमोल बावनकर इत्यादींचे मोलाचे सहकार्य लाभले.