Latest Posts

युएइ कडून इंधन खरेदीसाठी डॉलरऐवजी रुपयांमध्ये व्यवहार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : हिंदुस्थानी चलन रुपया अधिक मजबूत व्हावा. यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. संयुक्त अरब अमिरातीकडून खरेदी करण्यात आलेल्या इंधनाचा व्यवहार हिंदुस्थानने डॉलर्स ऐवजी रुपयांमध्ये करण्यास सुरुवात केली आहे.

द्विपक्षीय व्यापारामध्ये हिंदुस्थानी रुपयाचे चलन आणखी वाढावे यासाठी घेण्यात आलेला हा निर्णय असल्याचे सांगण्यात आले आहे. हिंदुस्थानमध्ये ८५ टक्के इंधन हे आयात केले जाते. या इंधनासाठी हिंदुस्थानने आतापर्यंत डॉलर्समध्ये व्यवहार केला होता. यापुढे हिंदुस्थान या इंधनासाठीचा व्यवहार रुपयांमध्ये करणार आहे.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आणि अबू धाबी राष्ट्रीय ऑईल कंपनीमध्ये इंधनाचा सौदा झाला. या सौद्याअंतर्गत १० लाख बॅरल कच्चे तेल खरेदी करण्यात आले. हा व्यवहार इंडियन ऑईलने हिंदुस्थानी चलन देऊन पूर्ण केला. याव्यतिरिक्त रशियातून आयात केलेल्या कच्च्या तेलाची रक्कमही हिंदुस्थानी चलनात देण्यात आली आहे. जुलैमध्ये अबू धाबी राष्ट्रीय ऑईल कंपनीसोबत झालेल्या करारानुसार हिंदुस्थान रुपयांमध्येच व्यवहार करेल असे ठरले होते. इतर तेल पुरवठादारांशीही हिंदुस्थान अशाच पद्धतीचा सौदा करण्याच्या तयारीत आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेत अमेरिकेचे चलन असलेल्या डॉलरची मक्तेदारी मोडून काढण्यासाठीअनेक देशांनी प्रयत्न सुरू केले आहेत. डॉलर्सच्या वापराऐवजी आपल्या चलनात व्यवहार पूर्ण करण्याचा हे देश प्रयत्न करत असून हिंदुस्थान हा या देशांमधील प्रमुख देश आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) ने गेल्या ३ वर्षांपासून सीमेपलिकडील व्यवहार रुपयांमध्ये करण्यास प्रोत्साहन दिले होते. यासाठी आरबीआयने १२ हून अधिक आंतरराष्ट्रीय बँकांना ‘रुपया’मध्ये व्यापार करण्याची परवानगी दिली आहे. आरबीआयने आतापर्यंत २२ देशांसोबत रुपयांत व्यापार करण्याचे मान्य केले आहे. रुपयाचे आंतरराष्ट्रीयकरण झाल्याने डॉलरची मागणी कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे जागतिक चलनातील घसरणीचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम कमी होईल.

Latest Posts

Don't Miss