– रस्ताकामांसाठी विनापरवानगी खोदकाम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली [Gadchiroli] : जिल्ह्यात अतिदुर्गम असलेल्या भामरागड तालुक्यात रस्ता बांधकामात घनदाट जंगलातून मोठ्या प्रमाणात मुरूमाचे उत्खनन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात जंगलातील उत्खननाकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपावरून चार वन कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे वन विभागाच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भामरागड, एटापल्ली तालुक्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू आहेत. घनदाट जंगल असल्याने या भागात रस्त्यांच्या कामासाठी लागणारा मुरूम लगतच्या जंगलातून काढला जात आहे. या मुरूमासाठी जंगलात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आलेले आहे. जंगल भागात उत्खनन करताना वनविभागाची परवानगी आवश्यक आहे. कसनसूर परिसरात ज्या पद्धतीने रस्त्यांच्या कामासाठी उत्खनन करून मुरूम काढण्यात आला त्यासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली नसल्याचे तसेच या बेकायदेशीर उत्खननाकडे वनविभागाच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या संदर्भात झालेल्या तक्रारीवरून वनविभागाने चौकशी सुरू केली होती.
भामरागडच्या साहाय्यक वनसंरक्षक यांनी चौकशी करून अहवाल भामरागडचे उपवनसंरक्षक शैलेश मीना यांना सादर केला. त्यानंतर उपवनसंरक्षक मीना यांनी तडकाफडकी कारवाई करून वनविभागाच्या चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या चारही कर्मचाऱ्यांवर बेकायदेशीर उत्खननाकडे मुद्दाम दुर्लक्ष केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. निलंबित करण्यात आलेल्यामध्ये कसनसूर वनपरिक्षेत्राच्या झुरी नियत क्षेत्रात कार्यरत असलेले वनरक्षक एम.ए. निलोकार, वांगेझरीचे क्षेत्र साहाय्यक ए.आर. कुमरे, भापडाचे क्षेत्र साहाय्यक डी.के. वासेकर, सोहगाव नियत क्षेत्राचे वनरक्षक उसेंडी यांचा समावेश आहे.
घनदाट जंगलात सुरू असलेली विकासकामे वन विभागाकडून अनेकदा थांबवली जातात. मात्र अशा पद्धतीने रस्त्यासाठी घनदाट जंगलातून बेकायदेशीरपणे मुरुमाचे उत्खनन झाले असताना याकडे दुर्लक्ष केल्यामुळे कंत्राटदार आणि वन कर्मचाऱ्यांच्या संदर्भात संगनमताचा आरोप होत आहे.