Latest Posts

बुद्धांच्या शिकवणीतून आली राज्य समाजवादाची संकल्पना : बौद्ध भिक्षू भदंत ज्ञान ज्योती यांचे प्रतिपादन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : बुद्धाला नेहमीच समाजाचे कल्याण हवे होते. त्यांच्या अनेक प्रवचनांमध्ये आणि त्रिपिटकासारख्या पवित्र ग्रंथात हे दिसून येते. भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत असलेली राज्य समाजवादाची संकल्पना भगवान बुद्धांच्या शिकवणीतून स्वीकारण्यात आली आहे, असा दावा संघाराम गिरी येथील सुप्रसिद्ध बौद्ध भिक्षू भदंत ज्ञान ज्योती महास्थवीर यांनी शनिवारी येथील गोकुळ नगर येथील सम्यक बुद्ध विहार येथे धार्मिक प्रवचन देताना केला.

यावेळी भन्ते धम्म ज्योती, भन्ते यशवर्धन, भन्ते सूर्य ज्योती, भन्ते शांती ज्योती, भन्ते अमर ज्योती, भन्ते शिवली, भन्ते महेंद्र आदी मान्यवर उपस्थित होते.

त्रिपिटकातील फितो भवतु लोकोच राजा भवतु धम्मिको या गाथेचा उल्लेख करून भदंत ज्ञान ज्योती यांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण प्रवचनात पुढे म्हटले की, बुद्धांनी तत्कालीन राजे प्रसेनजीत, बिंबिसार आणि इतरांना धार्मिक वृत्ती बाळगण्याचा एक मौल्यवान सल्ला दिला होता. कारण धार्मिक बुद्धी असलेला माणूसच जनतेच्या कल्याणासाठी कार्य करू शकतो. हा सल्ला सध्याच्या काळातही पाळण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले.

भारत हे बौद्ध धम्माची भूमी आहे. विविध उत्खननात बुद्ध संस्कृतीचे आणि बुद्ध कालखंडाचे अवशेष देशात सापडले आहेत. जे जुन्या काळातील महान धम्म आणि बौद्ध स्तूपांच्या व्याप्तीचा जिवंत पुरावा आहे. बौद्ध धम्मात मानव कल्याणाचे तत्त्वज्ञान असल्याने देशाला सुखी आणि समृद्ध करण्यासाठी ही मौल्यवान परंपरा जपली पाहिजे आणि पुढे नेली पाहिजे, असे भदंत ज्ञान ज्योती यांनी सांगितले.

बुद्ध धम्म ही एक क्रांती आहे. भारतीय राज्यघटनेत अनेक बौद्ध तत्त्वे आहेत. संविधानाच्या योग्य अंमलबजावणीची गरज असून ही जबाबदारी समर्थपणे पेलू शकणारे लोक धम्म निर्माण करू शकतो, असे प्रतिपादन त्यांनी केले. वैज्ञानिक दृष्टीकोन असलेला समानता आधारित समाज निर्माण करण्याचीही गरज आहे आणि बौद्ध धम्म ते करू शकतो, असेही ते पुढे म्हणाले.

प्रारंभी भदंत ज्ञानज्योती व इतर भिक्‍कुंचे सम्यक समाज समिती व विशाखा महिला मंडळाच्या सदस्यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन तुलाराम राऊत यांनी तर आभार हंसराज उंदिरवाडे यांनी मानले.

यावेळी रोहिदास राऊत, प्रा. गौतम डांगे, कवडूजी उंदिरवाडे, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप भैसारे, लहुजी रामटेके, सुनील उराडे, सुमित्रा राऊत, मनीषा वाळके आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी व नागरिक उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss