Latest Posts

ग्रा.प. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा डंका

– जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी सांभाळली प्रचाराची धुरा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : जिल्ह्यात ५ नोव्हेंबर रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल ७ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. त्यात जिल्ह्यातील अहेरी विधानसभा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचा) वर्चस्व दिसून आला. या निवडणुकीत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची जेष्ठ कन्या भाग्यश्री आत्राम यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. त्यात त्यांना मोठे यश मिळाले आहे.

अहेरी विधासभेतील ४ तालुक्यात सर्वच नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. भाजपचे माजी मंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम व आदिवासी विध्यार्थी संघाचे नेते तसेच माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार आणि माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. सर्वच पक्षाचे दिग्गज प्रचाराच्या मैदानात उतरल्याने ही निवडणूक रंगतदार होणार याची कल्पना सर्वांनाच होती. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, आदिवासी विध्यार्थी संघ यांनी प्रामुख्याने आपापले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवून अक्षरशः अस्तित्व पणाला लावले होते. यात भाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वार राष्ट्रवादी काँग्रेस ने बाजी मारली आहे.

५ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष निवडणूक झालेल्या एटापल्ली तालुक्यातील जांबिया, हालेवारा आणि नागुलवाडी या तिन्ही ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस चे सरपंच निवडून आले. त्यात अनुक्रमे गीता किशोर हिचामी, नीलिमा संतोष गोटा आणि नेवलु बंडू गावडे सरपंच म्हणून निवडून आले. भामरागड तालुक्यात टेकला, आरेवाडा, मडवेली, इरकडुमे, पल्ली आणि बोटनफुंडी असे सहा ग्रामपंचायतीची प्रत्यक्ष निवडणूक झाली. यात टेकला, बोटनफुंडी आणि पल्ली या तीन ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच अनुक्रमे काजल मधुकर धुर्वा, दुलसा नवलु मडावी, मनोज डिंगा पोरतेट निवडून आले. अहेरी तालुक्यात राजाराम (खां) आणि वेंकटापूर या दोन ग्रामपंचायतीची प्रत्यक्ष निवडणूक झाली. यात राजाराम ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच मंगला खुशाबराव आत्राम निवडून आले. तर सिरोंचा तालुक्यात कोटापल्ली ग्रामपंचायतची निवडणूक झाली याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवानी गणेश आत्राम सरपंच पदी निवडून आले.

अश्याप्रकारे प्रत्यक्ष निवडणूक झालेल्या १२ ग्रामपंचायती मध्ये ८ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच निवडून आले आहेत. काही ग्रामपंचायतीचे अविरोध निकाल पूर्वीच आले होते. तर मोठ्या संख्येने ग्रामपंचायत सदस्य देखील निवडून आले आहेत. विशेष म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्याबरोबर माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला होता. स्वतः प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन त्यांनी खिंड लढवून दाखविली.

जनतेचा विकासावर विश्वास : भाग्यश्री आत्राम
पहिल्यांदाच प्रचाराची धुरा स्वतः सांभाळली असून यामध्ये चांगल्या प्रकारे यश मिळाला आहे. विशेष म्हणजे केवळ निवडणुका आहेत म्हणूनच जनतेत न जाता बाराही महिने जनतेत असते. सर्वसाधारण लोकांशी रोजचा संपर्क आहे. मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या विकास कामावर जनतेचा विश्वास असल्यानेच आज ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हाला यश मिळाला आहे. आमच्यावर विश्वास ठेवून खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहून मतदारांचा व या निवडणुकीत परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा आभार.

Latest Posts

Don't Miss