– मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधि / चंद्रपूर (Chandrapur) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला सशक्तीकरण योजना तसेच महिलांसाठी राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती महिलांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने २८ सप्टेंबर २०२४ ला दुपारी १२ वाजता चांदा क्लब ग्राऊंड, चंद्रपूर येथे महिला मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार असून प्रमुख अतिथी म्हणून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, डॉ. नामदेव किरसान, आमदार सर्वश्री अभिजीत वंजारी, सुधाकर अडबाले, कीर्तिकुमार भांगडीया, सुभाष धोटे, किशोर जोरगेवार यांच्यासह जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल आदी उपस्थित राहतील.
यावेळी बचत गटांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत प्राप्त होणाऱ्या रकमेतून बचत गटामार्फत महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करणे, लखपती दिदी योजना, आर्थिक साक्षरता, महिला सक्षमीकरणासाठी महिलांचे संघटन, प्रशिक्षण व त्यांना स्वावलंबी करणा-या विविध योजना, महिलांसाठी सायबर सुरक्षा आदी विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.
जास्तीत जास्त महिलांनी सदर मार्गदर्शन मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) भागवत तांबे यांनी केले आहे.