– आर्वी ४, देवळी १, हिंगणघाट २, वर्धा ५ उमेदवारी अर्ज मागे
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघात एकुण १२ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता निवडणूकीच्या रिंगणात एकुण ६० उमेदवार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी राहुल कर्डिले यांनी आज पत्रकार परिषेदेत दिली. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक प्रक्रियेसंदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनील गावीत प्रामुख्याने उपस्थित होते.
विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ ला मतदान होणार असून २३ नोव्हेंबर २०२४ ला मतमोजणी होणार आहे. आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा या चारही विधानसभा मतदार संघासाठी एकुण ७२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी या चारही विधानसभा मतदार संघातून एकुण १२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. अंतिम माघारीनंतर रिंगणात असलेल्या एकुण उमेदवारांची संख्या आता ६० राहीली आहे.
आर्वी विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज वैध ठरलेल्या २२ उमेदवारांपैकी ४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यात दादाराव यादवराव केचे (अपक्ष), हितेंद्र व्यंकटराव वाघ (अपक्ष), तेलखेडे सोमराज शेषरावजी ( अपक्ष), येशुदास रामभाऊजी वाघमारे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) यांचा समावेश आहे. या मतदार संघात आता एकुण १८ उमेदवार रिंगणात आहेत. देवळी विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज वैध ठरलेल्या १५ उमेदवारांपैकी एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतला. यात किरण मारोतराव पारिसे (अपक्ष) या उमेदवाराचा समावेश आहे. या मतदार संघात आता एकुण १४ उमेदवार रिंगणात आहेत.
हिंगणघाट विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज वैध ठरलेल्या १४ उमेदवारांपैकी २ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. यात अनिल आत्माराम जवादे (अपक्ष), सुधीर दौलतचंद कोठारी (अपक्ष) या उमेदवाराचा समावेश आहे. या मतदार संघात आता एकुण १२ उमेदवार रिंगणात आहेत. वर्धा विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज वैध ठरलेल्या २१ उमेदवारांपैकी ५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. यात रवि प्रमोद शेंडे (अपक्ष), रेणुका रविंद्र कोटंबकार (अपक्ष), शरद मारोतराव आडे (अपक्ष), समीर सुरेशराव देशमुख (अपक्ष), सुधीर भाऊरावजी पांगुळ (अपक्ष) या उमेदवाराचा समावेश आहे. या मतदार संघात आता एकुण १६ उमेदवार रिंगणात आहेत.