Latest Posts

निवडणुकीच्या रणधुमाळीत सुरक्षादलाची मोठी कारवाई : ७ माओवाद्यांना कंठस्नान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / छत्तीसगढ (Chhattisgad) : छत्तीसगढच्या नारायणपूर येथे अबुझमाडच्या सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक होत आहे. डीआरजी-एसटीएफ जवानांनी अबुजमाडच्या जंगलात माओवाद्यांना घेरले आहे. या चकमकीत ७ माओवादांना ठार करण्यात आले.

जवानांनी आतापर्यंत २ महिलांसह ७ माओवादी कॅडरचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. बस्तरचे आयजी सुंदर राज पी. यांनी सांगितले की, घटनास्थळावरून एके ४७ सह मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केला. परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहिम राबवली जात आहे. नारायणपूर कांकेर सीमा भागात अबुझमाडच्या टेकमेटा आणि काकूरच्या मध्य जंगलात ही चकमक सुरू आहे.

सोमवारीसुद्धा सुकमा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत एका माओवाद्याला ठार करण्यात आले होते. ही चकमक सलातोंग भागात झाली होती. चकमकीत अनेक माओवाद्यांना गोळ्या लागल्या होत्या. यानंतर जवानांकडून शोधमोहिम हाती घेण्यात आली आहे.

छत्तीसगढमध्ये गेल्या काही दिवसांपासून माओवाद्यांसोबतच्या चकमकीत वाढ झाली आहे. यात सर्वात मोठी चकमक १६ एप्रिलला झाली होती. कांकेरमध्ये झालेल्या या चकमकीत २९ माओवाद्यांना कंठस्नान घातले होते. ही चकमक इतकी मोठी होती की जवानांसाठी अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला होता. सुरक्षादलाने एके ४७ सह मोठ्या संख्येने अटोमॅटिक शस्त्रे जप्त केली होती.

कांकेर जिल्ह्यात गेल्या महिन्यात ३ मार्चला हिदूर भागात चकमक झाली होती. हिदूरच्या जंगलात झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला होता. सुरक्षादलांनी इथून एका माओवाद्याच्या मृतदेहासह एक ४७ ताब्यात घेतली होती. जवान हिदूरच्या जंगलात शोधमोहिम राबवत असताना ही चकमक झाली होती. जंगलात जवान पोहोचताच माओवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला होता.

Latest Posts

Don't Miss