– पहिल्या टप्प्यात सहा विमानांमध्ये सुविधा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : देशातील अव्वल विमान कंपनी असलेल्या इंडिगो च्याविमानात आता बिझनेस क्लासची सुविधा मिळणार आहे. त्याची सुरुवात येत्या १४ नोव्हेंबरपासून होणार आहे. पहिल्या टप्प्यात सहा विमानांमध्ये ही सुविधा देण्यात येईल.
विशेष म्हणजे, ही सहाही विमाने मुंबई ते दिल्ली या मार्गावर उड्डाण करतील. या मार्गावर उड्डाण करणाऱ्या प्रत्येक विमानात बिझनेस क्लासची एकूण १२ आसने असतील. तर सहा विमानांत मिळून ७२ आसने उपलब्ध होतील. आजवर इंडिगो कंपनीतर्फे परवडणाऱ्या दरातील विमान सेवा उपलब्ध होत होती. आता मात्र, प्रवाशांना आरामदायी व्यवस्था देण्यासाठी ही बिझनेस क्लासची सुविधाही कंपनीने उपलब्ध केली आहे.
मुंबई ते दिल्ली भाडे १८०१८ –
मुंबई ते दिल्ली या सर्वांत व्यग्र हवाई मार्गासाठी कंपनीने बिझनेस क्लासच्या भाड्याचे दर १८,०१८ रुपये निश्चित केले आहेत. अन्य विमान कंपन्यांच्या बिझनेस क्लासच्या दरांच्या तुलनेत हे दर स्पर्धात्मक आहेत. आगामी वर्षभराच्या काळात इंडिगोच्या ताफ्यातील ४५ विमानांमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार असून, एकूण १२ शहरांसाठी ही सुविधा उपलब्ध होणार आहे.