Latest Posts

वैयक्तिक शेततळे योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे ही योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येते. या योजनेसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र मनोहरे यांनी केले आहे.

शेततळे योजनेतून संरक्षित सिंचन शेतीला मिळावे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तेव्हा ओढे, नाले, नदी इत्यादी वाहून जाणारे पाणी उपसून अथवा तलाव, विहीर, बोअर अशा अन्य सिंचन सुविधांमधून पाण्याचा उपसा करून त्याची साठवणूक करण्याकरिता शेतावर शेतळ्यासारखी पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे. इच्छुक शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलच्या http://mahadbtmahit.gov.in या संकेतस्थळावर सीएससी केंद्रामार्फत अथवा वैयक्तिकरित्या ऑनलाईन नोंद करून या योजनेचा लाभ घेता येईल.

असा करावा अर्ज :
शेततळे योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करू शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारास अर्ज भरत असताना महाडीबीटी प्रणालीवर लॉगीन केल्यानंतर ‘सिंचन साधने व सुविधा’ या शीर्षकांतर्गत ‘वैयक्तिक शेततळे’ ही बाब निवडण्यात यावी. त्यांनतर शेततळ्याचे आकारमान व स्लोप निवडण्यात यावा तसेच इतर आवश्यक माहिती भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

अर्ज करण्यासाठी २३ रुपये ६० पैसे शुल्क ऑनलाईन भरावे लागेल. अर्जदार शेतकऱ्याची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक आहे. अर्जदार शेतकऱ्याने यापुर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे अथवा इतर कोणत्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकासाठी शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत जास्तीत जास्त ३४x३४x३ मीटर व कमीत कमी १५X१५X३ मीटर असे विविध ८ प्रकारच्या आकारमानाचे इनलेट आऊटलेटसह किंवा इनलेट आऊट विरहीत शेततळ्यासाठी खोदकामाच्या परिमाणाच्या प्रमाणात कमाल मर्यादा रक्कम ७५ हजार रुपयांच्या मर्यादेत अनुदान देय राहील.

तरी या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी कृषी सहायक, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

Latest Posts

Don't Miss