विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : सामाजिक समता व समरसता निर्माण करण्याचे दृष्टीने आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य देण्याची योजना समाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येत आहे. आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती विमुक्त जाती व भटक्या जमातिच्या व्यक्तीपेकी एक व्यक्ती व दुसरी व्यक्ती सुवर्ण, हिंदू लिंगायत जैन, शिख यांच्यातील असेल तर अशा आंतरजातीय विवाहितास लागू करण्यात आलेली आहे. तसेच या योजनेंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती यामधील आंतर प्रवर्गामधील आंतरजातीय विवाहितांसाठी आंतरजातीय विवाहाच्या सवलती लागू करण्यात आलेल्या आहेत. या योजनेमध्ये रक्कम ५० हजार रुपये याप्रमाणे प्रति जोडपे डीबीटी तत्वावर अनुदान देण्यात येते. हे अनुदान विवाहित जोडप्यांचे मूळ कागदपत्राची तपासणी करून त्यांचे संयुक्त बँक खात्यावर पीएफएमएस प्रणालीमार्फत डीबीटीद्वारे प्रदान करण्यात येते. ही योजना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत नवविवाहित लाभार्थी जोडप्यांना आर्थिक सहाय्य करीत आहे.
विभागामार्फत कुठल्याही नवविवाहितांना दूरध्वनीद्वारे संपर्क केला जात नाही. तरी काही अनोळखी व्यक्ती दूरध्वनी द्वारे आंतरजातीय विवाहित जोडप्यांना आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजनांचे पैसे मिळत असल्याबाबत चुकीची माहिती पसरवित असल्याचे या कार्यालयाचा निदर्शनास आले आहे. सदर बाब ही गंभीर स्वरुपाची असून नवविवाहित जोडप्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याची आशंका नाकारता येत नाही. तरी असे फोन आल्यास त्वरित स्थानिक पोलीस स्टेशन व जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, नागपूर या कार्यालयात तत्काळ तक्रार करण्यात यावी, असे आवाहन विभागामार्फत करण्यात येत आहे. या पूर्वी आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजनांचे लाभ दिलेल्या लाभार्थी जोडप्यांची यादी ही जिल्हा परिषद, नागपूर यांची वेबसाईट https://www.nagpurzp.com वर उपलब्ध आहे.