विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / इस्रायल (Israel) : गाझावर सातत्याने हल्ले करत आहे. पॅलेस्टिनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दावा केला आहे. गाझामध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात किमान ३० लोक मारले गेले आहेत, ज्यात बहुतांश महिला आणि लहान मुले आहेत.
ते म्हणाले की, मंगळवारच्या हल्ल्यात गाझा पट्टीमध्ये चार मुले आणि दोन महिलांसह १० लोक मारले गेले, तर सोमवारी रात्री उशिरा झालेल्या हल्ल्यात बीट लाहिया शहरात किमान २० नागरिकांचा मृत्यू झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याही माहितीही त्यांनी दिली.
रुग्णालयाचे संचालक हुसम अबू साफिया यांनी सांगितले की, सोमवारी इस्रायलने बीट लाहिया शहरातील इमारतीवर हल्ला केला होता. युद्धकाळात त्या इमारतीत अनेक कुटुंबे आश्रय घेत होती. त्याच ठिकाणी हल्ला झाल्याने मोठ्या प्रमाणात माणसे दगावली. दरम्यान गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या आपत्कालीन सेवेने जाहीर केलेल्या मृतांच्या यादीनुसार, मृतांमध्ये आठ महिला आणि सहा मुलांचा समावेश आहे.
इस्रायलचे लक्ष्य उत्तर गाझा –
या प्रकरणी इस्रायली लष्कराकडून तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. इस्रायलने जवळजवळ एक महिन्यापासून उत्तर गाझाला मोठ्या प्रमाणावर लक्ष्य केले आहे आणि बीट लाहिया, जवळचे बीट हुनान शहर आणि शहरी जबलिया येथील निर्वासितांच्या छावण्या पूर्णपणे रिकाम्या करण्याचा इशारा दिला आहे. गेल्या महिन्याभरात या विभागात कोणतीही आर्थिक किंवा अन्यधान्याची मदत वितरित करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे इस्रायलकडून या भागाला लक्ष्य केले जाईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात होती.