Latest Posts

कुमणार वासीयांनी पहिल्यांदाच साजरी केली दिवाळी

– सामाजिक बांधिलकी जपणारा खाकी वर्दीतील अवलिया : पोलीस उपनिरीक्षक विजय सपकळ 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : गडचिरोली सारख्या अधिक दुर्गम, अतिनक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील भागात या शासकीय योजनांचा लाभ येथील गरजवंतांना मिळाला तर नाहीच परंतु त्यांना आपल्या मूलभूत गरजांसाठी सुद्धा भटकंती करावी लागत असते. कुमणार हे गाव छत्तीसगड राज्याचे सिमेलगत असून या गावातील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत. गावातील आदिवासी बांधवांनी अजून एकदाही दिवाळी साजरी केली नव्हती. यावेळी आपण खरंच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना एकीकडे डिजिटल भारत दुसरीकडे अन्नासाठी धडपड या विकासाच्या ध्रुवीकरणाची खंत मनात वाटते. याची दखल आता स्वतः लाहेरी पोलिसांनीच घेऊन येथील पीडित/दुर्लक्षित नागरिकांचा भार आपल्या खांद्यावर घेऊन त्यांना सुद्धा चांगले जीवन जगण्याकरिता सोबत घेण्याचा निर्धार केला.

याकरिता लाहेरी गावांमधील प्रतिष्ठित नागरिक शामराव येरकलवार, बालू बोगामी, कवीश्वर, सरपंच राजश्वरी बोगामी, कोतवाल शंकर मडावी यांच्या मदतीने पोलीस उपनिरीक्षक विजय सपकळ यांनी आज रोजी कुमणार गावातील दुर्लक्षित नागरिकांना विशेषतः महिलांना त्यांची दिवाळी सुखकर करण्याकरिता लाहेरी येथे भव्य शिबिराचे आयोजन केले होते त्यात सर्व पुरुष व महिलांना नवीन कपडे व साड्या वाटप करण्यात आल्या तसेच मिठाई वाटप करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसुर्य, जन नायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून झाली.  कार्यक्रमाच्या सुरुवातीला बालु बोगामी यांनी प्रास्ताविकपर भाषण केले. त्यामध्ये त्यांनी विजय सपकळ सारख्या समाज प्रवर्तकांची समाजामध्ये गरज असल्याचे सांगत त्यांचे आभार मानले. नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही विविध योजना राबवतो परंतु आता लोकांनी सुद्धा पुढे येऊन सामाजिक बदल घडवण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले व जास्तीत जास्त नागरिकांना विविध योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिलेव व मेळाव्याची रूपरेषा सांगितली.

त्यानंतर कार्यक्रमास हजर असलेले शामराव येरकलवार यांनी आलेल्या सर्व नागरिकांना कुठली अडचण आल्यास आम्ही तत्पर राहू असे आश्वासन दिले.

लाहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संतोष काजळे यांनी आलेल्या सर्व प्रमुख पाहुणे, कामगारांचे व महीलांचे आभार मानत  विविध विषयांवर मार्गदर्शन केले.त्या त्यादरम्यान त्यांनी विविध योजनांची माहिती दिली तसेच दुर्गम भागातील ग्रामस्थांना गरिबीवर मात करत त्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी सर्वोतपरी मदत करणार असल्याचे आश्वासित केले.

कार्यक्रमाच्या दुसर्‍या टप्प्यात अध्यक्षांच्या व लाहेरी पोलिसांच्या हस्ते कपडे, साड्या व मिठाई वाटप करण्यात आली. कुमणार वासियांनी पोलीस उपनिरीक्षक विजय सपकळ व लहेरी येथील प्रतिष्ठित ग्रामस्थ यांचे विशेष आभार मानले.

कार्यक्रमाची सूत्रसंचालनाची धुरा कोतवाल शंकर मडावी यांनी सांभाळली व पोलीस उपनिरीक्षक प्रशांत डगवार यांनी अतिदुर्गम भागातून पायी चालत मेळाव्यास आलेल्या महिलांचे, नागरिकांचे व प्रमुख पाहुणे व विजय सपकळ यांचे विशेष आभार व्यक्त करत विजय सपकळ यांच्यासारखा बांधिलकी जपणारा अधिकारी क्वचितच असतो असे मत व्यक्त केले.

Latest Posts

Don't Miss