Latest Posts

लालपरी असुरक्षित, गाड्यांतील प्रथमोपचार पेट्या रिकाम्याच : अग्निशमन यंत्रणेकडे दुर्लक्ष

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असे ब्रीद घेऊन शहरापासून गावखेड्यापर्यंत धावणारी राज्य परिवहन महामंडळाची लालपरी खऱ्या अर्थाने लोकवाहिनी ठरली; मात्र सोयीसुविधांच्या अभावामुळे आता लालपरीतील प्रवास असुरक्षित ठरू लागला आहे.

महामंडळाच्या बसेसमध्ये असलेल्या प्रथमोपचार पेट्या कायम रिकाम्या असतात. याकडे महामंडळाचे दुर्लक्ष असल्याने प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आल्याचे चित्र मुंबई सेंट्रल आगारामध्ये उभ्या असलेल्या बसची पाहणी केल्यानंतर दिसून आले.

गेल्यावर्षी राज्यात २५ हजार ४५६ रस्ते अपघातात ११ हजार ४५२ जणांचा मृत्यू झाला तर २० हजार १३७ जण जखमी झाले आहेत. अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहनांमध्ये सोयी-सुविधा उपलब्ध असायला हव्यात.
एसटीने मोठ्या प्रमाणात प्रवास केला जातो. एसटीमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा, प्रथमोपचारपेटी असली पाहिजे. याबाबत बसेसची पाहणी केली असता अनेक बसमध्ये अग्निशमन यंत्रणा आहे; परंतु लालपरीमध्ये प्रवास करताना अपघात झाल्यास प्रवाशांसह चालक, वाहकांवर प्रथमोपचारासाठी चालकाच्या केबिनमध्ये प्रथमोपचार पेट्या बसविण्यात आल्या होत्या; मात्र अनेक एसटी बसमधून या पेट्या गायब झाल्या आहेत तर काही बसमध्ये पेट्या आहेत, मात्र त्यातील औषधे बेपत्ता आहेत.

अग्निशमन यंत्रणेकडे दुर्लक्ष :
बसेसची पाहणी केली असता एक-दोन बसमध्ये अग्निशमन यंत्रणाच नसल्याचे दिसून आले आहे. अग्निशमन यंत्र बसविण्याकडे महामंडळाचेही दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी लालपरीत आगीच्या धास्तीने प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अग्निशमन यंत्र बसविण्याची गरज आहे.

बसस्थानकात आओ जाओ घर तुम्हारा :
मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळाच्या बसस्थानकात येणाऱ्या जाणाऱ्यांना कुणी हटकले नाही. येथील बसस्थानकामध्ये आओ जाओ घर तुम्हारा असाच प्रकार सुरू आहे.

Latest Posts

Don't Miss